वाडा : तालुक्यातील कोंढले-म्हसवल-खैरे रस्ता अनेक गावांना मुख्य बाजारपेठेस जोडणाऱ्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, वाहन चालवणे कठीण झाल्याने चालक हैराण झाले आहेत. तालुक्यातील सर्वात खराब मार्ग म्हणून या रस्त्याची ओळख निर्माण झाली आहे. या रस्त्यासंदर्भात वारंवार तक्रारी करूनदेखील संबंधित अधिकारी या रस्त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचा आरोप भाजप महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा अंकिता दुबेले यांनी केला आहे.
या रस्त्यावरील सापरोंडे ते दिनकरपाडादरम्यान काँक्रीट मार्ग करण्यात आला आहे. मात्र निकृष्ट दर्जामुळे तोही दुभंगला असून, दुचाकीस्वारांचे अपघात नेहमी रस्त्यावर होत असतात. दिनकरपाडा ते म्हसवल या गावांदरम्यान रस्त्यावर- तलावासारखे खड्डे पडले असून, वाहनचालक जीव मुठीत घेऊन वाहन चालवत आहेत. चंद्रपाडा व पुढे खैरे गावाकडे जाणारा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बनवण्यात आला होता. मात्र रस्ता बनवल्यापासून त्यांची अवस्था गंभीर झाला असून, सहा महिनेही चांगला प्रवास करता आला नाही, असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.