मुंबई : नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत फुटलेल्या आपल्या आमदारांवर काँग्रेस दोन दिवसांत कारवाई करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे मुंबई दौऱ्यावर येत असून, शुक्रवारी १९ जुलै रोजी या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत राज्यातील काँग्रेस नेत्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये कारवाईचा निर्णय होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले होते. मात्र, त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे ७ आमदार फुटल्याने मविआच्या उमेदवाराचा पराभव झाला, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना आमदार फुटल्याने काँग्रेस पक्ष नेतृत्वाची चिंता वाढली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणकीपर्वी डॅमेज कंटोलच्या दृष्टीने काँग्रेस हायकमांडकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यादृष्टीने आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शुक्रवार, १९ जुलै रोजी सकाळी १० वाजता गरवारे क्लब येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आणि के. सी. वेणुगोपाल व रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत काँग्रेसच्या फुटीर आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तसेच या बैठकीत के. सी. वेणुगोपाल हे विधानसभा निवडणूक तयारीच्या दृष्टीने काँग्रेस नेते, पदाधिकारी, खासदार, आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजता प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा प्रभारी, खासदार, आमदार, आघाडी संघटनांचे प्रमुख यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले जाणार असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांनी दिली.