Health : मागील आठवड्यातच अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याने अनंत-राधिका अंबानीच्या लग्नाला जाणं टाळलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा बातमी समोर आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांना देखील आता कोरोनाची लागण झाली आहे. आता यानंतर आता पुन्हा कोरोना महामारीबाबत चर्चा सुरू झाली.
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, अमेरिकेत हा आजार वेगाने पसरत आहे. ज्याचा फटका अमेरिकेच्या राष्ट्रपतींनाही बसला आहे. यानंतर आता कोरोना महामारी पुन्हा येतेय का? असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. अमेरिकेसह जगातील विविध देशांमध्ये रुग्णांची वाढती संख्या कोरोना महामारीच्या दिशेने बोट दाखवत आहे असं चित्र दिसत आहे.
WHO ची चिंताजनक माहिती..
अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वेगाने वाढ होताना दिसत आहे, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. बायडेन यांना कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आल्यानंतर त्यांनी स्वतःला क्वारंटाईन केले आहे. व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, लास वेगासमधील निवडणूक प्रचारादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांना कोविड-19 ची लागण झाल्याचे आढळून आले आहे. त्यांचे पुढील कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी करीन जीन-पियरे यांनी सांगितले की, 81 वर्षीय बायडेन यांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. बूस्टर डोसही दिला आहे.
कोरोना दर आठवड्याला 1700 लोकांचा बळी.. : WHO
नुकताच, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक अलर्ट जारी केला होता की, कोरोना महामारी अद्याप पूर्णपणे संपलेली नाही. WHO च्या अभ्यासानुसार, सध्या जगभरात कोरोनामुळे दर आठवड्याला 1700 लोकांचा मृत्यू होत आहे. चिंतेची बाब म्हणजे कोरोनाचा नवीन व्हेरिएंट उदयास येत आहे. ज्या लोकांना आपल्या उत्तम प्रतिकारशक्तीमुळे कोरोनाचा परिणाम झाला नव्हता, त्यांनाही आता याचा फटका बसू लागला आहे. असं WHO ने म्हटलं आहे.
अमेरिकेत कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
- कॅलिफोर्निया, फ्लोरिडा, मेरीलँड, ओरेगॉन आणि टेक्सासमध्येही संख्या वाढली आहेत.
- लोकांना कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे.
- ताज्या अहवालानुसार, अमेरिकेतील 7 राज्यांमध्ये प्रकरणे झपाट्याने वाढली आहेत.
- अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंध विभागाने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.