पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) माजी नगरसेवकाच्या मुलाने दारु पिऊन टेम्पोला धडक दिल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा ड्रायव्हर आणि क्लीनर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. त्याचबरोबर नगरसेवकाचा मुलगा देखील जखमी झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा सौरभ गायकवाड असं दारू पिऊन अपघात केलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना पुण्यातील मांजरी-मुंढवा रस्त्यावर झेड कॉर्नर येथे मंगळवारी 16 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास घडली आहे.
नेमकं काय घडलं?
सौरभ गायकवाड हा त्याची MH 12 TH 0505 या क्रमांकाची हॅरीयर कार घेऊन पहाटे पाच वाजता दारुच्या नशेत घरी निघाला होता. त्यावेळी समोरुन येणाऱ्या पोल्ट्री फार्मच्या टेम्पोला त्याने जोरदार धडक दिली. या धडकेत दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच चालकाच्या कपाळावर जखम झाली असून खांद्याला मुका मार लागला आहे.
तर क्लीनर राजा शेखच्या चेहऱ्यावर खर्चटले असून उजव्या पायाच्या नडगीला जखम झाली आहे. अपघातस्थळी जमलेल्या नागरिकांनी चालक व क्लीनरला वरद लाइफ हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, याप्रकरणी सौरभ गायकवाड याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ गायकवाडचे वडील बंडू गायकवाड हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात कार्यरत आहेत.