लोणी काळभोर : भारत पेट्रोलियम कंपनीच्या तरडे (हवेली) येथील डेपोच्या आवारात मागील महिनाभराच्या काळात “अंडर पाईपलाईन सिस्टिम”च्या माध्यमातून दोन टॅंकर चालक शेकडो लिटर डिझेलची चोरी करताना आढळून आले आहे. मात्र, भारत पेट्रोलियम कंपनीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून इंधन चोरीच्या घटनेत एकाला सजा, तर दुसऱ्याला बक्षिस दिले गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हा एकसारखा असताना एकाला सजा, तर दुसऱ्याला बक्षिस मिळाल्याने भारत पेट्रोलियम कंपनीचे तरडे येथील अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहेत.
तरडे (हवेली) येथील भारत पेट्रोलियम कंपनीच्या डेपोच्या आवारात जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात एक, तर जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक असे दोन टँकर चालक “अंडर पाईपलाईन सिस्टिम”च्या माध्यमातून शेकडो लिटर डिझेल टॅंकरच्या टाकीत भरताना रंगेहाथ कंपनीच्या रात्रपाळीच्या सुरक्षा रक्षकांना आढळून आले होते. याबाबतची संपुर्ण माहिती वरीष्ठ अधिकाऱ्यांना मिळूनही, इंधन चोरीच्या घटनेत एका टँकर मालकाला सजा, तर दुसऱ्या टँकर मालकाला बक्षिस मिळाल्याची चर्चा आहे. या घटनेमुळे “अंडर पाईपलाईन सिस्टिम”च्या माध्यमातून होणाऱ्या गैरप्रकारात कंपनीच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचा गंभीर आरोप केला जात आहे.
“पुणे प्राईम न्यूज”ला सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जून महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात तरडे येथील डेपोच्या परिसरात उभ्या असलेल्या इंधनवाहू टँकरच्या टाकीमधून इंधन बाहेर पडत असल्याची बाब तेथील सुरक्षा रक्षकाच्या लक्षात आली. संबंधित सुरक्षा रक्षकाने वरील बाब कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवली. सुरक्षा रक्षकांनी दिलेल्या माहितीची खातरजमा करण्याच्या उद्देशाने एक कनिष्ठ व एक वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी आले. मात्र, दोन्ही अधिकाऱ्यांनी सुरक्षा रक्षकाला गप्प राहण्यास सांगून, टॅंकर मालकास टॅंकर हलविण्यास सांगितले. तसेच संबधित टँकर चालकाला गोड शब्दांत समज देऊन पाठवले.
दरम्यान दुसऱ्या घटनेत म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तोच सिन रिपीट झाला. मात्र, यावेळी टँकर मालक गरीब, तर त्याची ट्रान्सपोर्ट कंपनी छोटी असल्याने, त्यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी टॅंकर चालकास कारवाईची भाषा सुरु केली. तसेच संबंधित टॅंकर सलग्न असलेल्या, त्याच्या ट्रान्सपोर्ट कंपनीच्या मालकाला फोन करुन कारवाईची धमकी देण्यास सुरुवात केली. या दमदाटीला घाबरुन दुसऱ्या घटनेतील टँकर चालकाने कंपनीचे लोखंडी गेट तोडून धूम ठोकली. एकाच तेल डेपोच्या आवारात दोन वेगवेगळ्या घटनेत दोन टँकर चालक “अंडर पाईपलाईन सिस्टिम”च्या माध्यमातून एकाच प्रकारची चोरी करत असताना रंगेहाथ मिळाल्यानंतर एकाला सजा, तर दुसऱ्याला बक्षिस मिळाल्याचे पुढे आले आहे.
या दोन्ही घटना पाहिलेला एक टँकर चालक “पुणे प्राईम न्यूज”शी बोलताना म्हणाला, तरडे येथील कंपनीच्या इंधन डेपोमध्ये मागील वीस दिवसांच्या काळात दोन टॅंकर चालक “अंडर पाईपलाईन सिस्टिम”च्या माध्यमातून चोरी करताना, खुद्द कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहिले होते. पहिला टँकर मोठ्या वाहतूकदाराचा असल्याने, कंपनीच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने संबंधित टॅंकर चालकाला अभय दिले. मात्र, दुसऱ्या घटनेतील टॅंकरवर कारवाईचे नाटक केले आहे. वरील घटनेतील दोन्ही टँकर चालक व मालकांवर कारवाई होण्याची गरज होती. मात्र, कंपनीच्या काही अधिकाऱ्यांना मलिदा मिळत असल्यानेच एकाला सजा, तर दुसऱ्याला बक्षिस दि्लेले आहे.