पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात वाहनांचे तोडफोड करण्याचे सत्र सुरुच आहे. पिंपरी येथील अशोक थेटरच्या पाठीमागे तीन जणांच्या टोळक्याने एका व्यावसायिकाला कोयत्याने मारहाण करत जबरदस्तीने खिशातील पैसे काढून घेतले. तसेच परिसरातील गाड्यांची तोडफोड करुन परिसरात दहशत माजवली आहे. ही घटना १५ जुलै रोजी मंगळवारी सकाळी पावणे सहाच्या दरम्यान घडली. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करुन दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.
याबाबत मल्लीकार्जुन चंद्रशेखरय्या साली (वय-36 रा. राजश्री टॉवर्स, गोलांडे इस्टेट, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून प्रतीक धंदर, मुबारक शेख दोघे (रा. पिंपरी) यांना अटक केली आहे. तर अमन शेख (रा. पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सकाळी पावणे सहा वाजता जिम वरून घरी जात असताना धनराज ट्रेडर्सच्या जवळ थांबले होते. त्यावेळी तिघेजण आरोपी दुचाकीवरुन तेथे आले. त्यांनी मल्लीकार्जुन साली यांना कोयत्याचा धाक दाखवत, तसेच हाताने मारहाण करुन उलटा कोयता मारुन जखमी केले. त्यानंतर त्यांनी फिर्यादी यांच्या खिशातील जबरदस्तीने पाकीट काढले आणि त्यातील साडे चार हजार रुपये काढून घेतले.
दरम्यान, दहशत पसरवण्यासाठी रस्त्यावर पार्क केलेल्या चारचाकी गाडीची काच फोडली आणि इतर तीन गाड्यांच्या काचा फोडून परिसरात दहशत पसरवून निघून गेले. याबाबत तक्रार केल्यानंतर पिंपरी पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन दोघांना अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.