मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून ‘निष्ठावान संवाद’ दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या दौऱ्यातंर्गत जयंत पाटील हे लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या यशात योगदान देणाऱ्या आणि पक्षाचे निष्ठेने काम करणाऱ्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या जिल्हानिहाय भेटीगाठी घेऊन त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. ‘निष्ठावंतांशी संवाद, विक्रमी यशाचा विश्वास’, हे घोषवाक्य घेऊन बुधवार, १७ जुलैपासून सातारा येथून ‘निष्ठावान संवाद’ या राज्यव्यापी दौऱ्याची सुरुवात होणार आहे.
या संवाद दौऱ्यातंर्गत जयंत पाटील हे सातारा, सोलापूर, जळगाव, धुळे, नाशिक, अहमदनगर, बीड, जालना, परभणी आदी जिल्ह्यांचा दौरा करून विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. २७ जुलै रोजी परभणी येथे या दौऱ्याची सांगता होणार आहे. या दौऱ्यात पक्षाचे सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, फ्रंटल सेलच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तुतारीचा आवाज राज्यात घुमण्यासाठी सहभागी व्हावे, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले आहे.