पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत रोज नवनवीन खुलासे समोर येत आहे. आता यांचा आणखी एक प्रताप उघड झाला आहे. पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी घरचा खोटा पत्ता दिल्याचे उघड झाले आहे. तसेच त्यांनी बनावट रेशन कार्ड दिल्याचही उघड झालं आहे. ही माहिती उघड झाल्याने आता त्यांच्या अडचणी आणखीनच वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पूजा खेडकर यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी खोटा पत्ता दिला होता. पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाला खोटा पत्ता आणि बनावट रेशन कार्ड देऊन पूजा यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवल्याचं समोर आलं आहे. पिंपरी चिंचवड हद्दीत राहत असल्याचे सांगत, प्लॉट नंबर 52, देहू-आळंदी, तळवडे हा पत्ता पूजा खेडकरांनी रुग्णालयात दिला होता. मात्र या पत्त्यावर निवासी मालमत्ता नसून थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिडेट कंपनी आहे. ही कंपनी आता बंद झाली आहे.
मात्र थर्मोवेरिटा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिडेट कंपनीचा पत्ता हा निवासाचा पत्ता म्हणून दिल्याने पूजा खेडकरांनी खोटी माहिती दिली होती, हे स्पष्ट झालं आहे. तिथे कोणीही रहिवासी नसताना, पूजा यांनी या कंपनीच्या पत्त्यावर बनावट रेशन कार्डही बनवल्याचे आणि त्याचा वापर अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी केला अशी माहिती समोर आली आहे.
केवळ बनावट अपंगत्व प्रमाणपत्रच नव्हे तर थर्मोवेरिटा कंपनीच्या नावावर ऑडी कारचीही नोंदणी करण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड पालिकेच्या कर संकलन विभागानुसार या कंपनीवर गेल्या तीन वर्षांपासून 2.7 लाख रुपये थकीत आहेत. पिंपरी पालिकेच्या कर संकलन विभागाकडून ही माहिती मिळाली आहे.