पुणे : राज्यात महावितरणला सर्वात जास्त महसूल मिळवून देणारी देशातील पहिली स्मार्ट सिटी म्हणून पुणे झोनची ओळख आहे. असं असताना देखील पुणे परिमंडळालाही वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याच्या घटनेचा सामना करावं लगत आहे. पुणे परिमंडळालाही वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचा घटनेला सामोरे जावे लागत आहे.
जानेवारीमध्ये पुण्यात तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित होण्याच्या ६८७ घटना घडल्या आहेत. यामध्ये पुण्यातील जवळपास २२ लाख ग्राहकांना १,४९६ तास अंधारातच राहावे लागले, तर मार्चमध्ये संपूर्ण पुणे परिमंडळात तांत्रिक बिघाडामुळे वीज खंडित होण्याच्या ८९१ घटना घडल्या आहेत. यामध्ये ३१ लाख ग्राहकांना २,४७२ तास अंधाराचा सामना करावा लागला आहे. हे प्रकार महावितरणच्या जानेवारी आणि मार्च महिन्याच्या विश्वासार्हता निर्देशांकातून समोर आले आहे.
दरम्यान, वीज नियामक आयोगाच्या नियमावलीनुसार महावितरणने दर महिन्याला विश्वासार्हता निर्देशांक प्रसिद्ध करणे अनिवार्य आहे. यामध्ये वीजपुरवठा किती वेळा खंडित झाला, ग्राहकांना किती काळ अंधारात बसावे लागले तसेच विजेची वारंवारता किती वेळा कमी झाली, याची माहिती मिळत असते.
मात्र, महावितरणने जानेवारी महिन्याच्यानंतर मासिक विश्वासार्हता निर्देशाकच जाहीर केले नाही. त्यामुळे सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी आयोगाला पत्र पाठवून हे निर्देशांक दरमहा संकेतस्थळावर प्रसिद्ध करा, अश मागणी केली होती. त्यानंतर महावितरणने लपवलेले निर्देशांक प्रसिद्ध केले आहेत.
याबाबत बोलताना विवेक वेलणकर म्हणाले कि, महावितरणने दर महिन्याला विश्वासार्हता निर्देशांक प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. पण, कान पिळल्यावरच काम करायची सवय कधी जाणार? राज्य वीज नियामक आयोग हे निर्देशांक बघते का? तसेच ग्राहक सेवेच्या ढासळलेल्या दर्जाबाबत महावितरणला जबाबदार धरून कधी कारवाई करणार? या प्रश्नांची उत्तरे ग्राहकांना मिळाली पाहिजे, असे वेलणकर म्हणाले.