मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हाबाबत आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार गटाला दोन आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच याबाबत पुढील सुनावणी ६ ऑगस्टला होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला आहे. या निर्णयाविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला महत्वाचे निर्देश दिले आहेत.
अजित पवार गटाने २ आठवड्यात उत्तर सादर करावे
अजित पवार गटाने दोन आठवड्यात उत्तर सादर करावे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच अजित पवार यांच्या उत्तरावर जर शरद पवार यांना प्रतिवाद सादर करायचे असतील, तर एका आठवड्यामध्ये शरद पवारांनी ते दाखल करावे, असेही कोर्टाने म्हटले आहे. दरम्यान, दोन आठवड्यात अजित पवार गटाने सुप्रीम कोर्टाला उत्तर द्यावं आणि त्यानंतर एक आठवड्यात आम्ही उत्तर द्यावं, असं कोर्टाने आजच्या सुनावणीत म्हटले आहे. ६ ऑगस्टला पुढील सुनावणी होईल असंही कोर्टाने सांगितले आहे.