पिंपरी चिंचवड : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आमदार अश्विनी जगताप यांच्या मतदारसंघावर दीर पिंपरी- चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दावा केला आहे. यावरून वादविवाद सुरू असतानाच आता यामध्ये आणखी एका नावाची भर पडली आहे. भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे एकेकाळचे कट्टर समर्थक शत्रुघ्न काटे यांनी देखील निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आता चिंचवडमधून नेमकी कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहून महत्वाचं ठरणार आहे.
चिंचवड विधानसभा उमेदवारीवरून विद्यमान आमदार अश्विनी जगताप आणि शहराध्यक्ष शंकर जगताप या दीर-भावजयांमध्ये लक्ष्मण जगतापांचा खरा उत्तराधिकारी कोण? यावरून वादविवाद सुरू आहेत. अशातच आता भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांचे एकेकाळचे कट्टर समर्थक शत्रुघ्न काटेंनी मीच खरा उत्तराधिकारी म्हणत या वादात उडी घेतली आहे.
शत्रुघ्न काटे म्हणाले की, भाजप परिवारवाद टाळेल आणि मला उमेदवारी देईल. मात्र, असं झालं नाही तरी मी निवडणूक लढवायचं ठरवलं आहे, असं म्हणत शत्रुघ्न काटेंनी बंडखोरीच्या तयारीत असल्याचं यावेळी बोलून दाखवलं आहे. शत्रुघ्न काटेंनी समर्थकांसोबत बैठक घेऊन, याची घोषणा केली. आज लक्ष्मण भाऊ असते तर त्यांनी मलाच त्यांचं राजकीय उत्तराधिकारी बनवलं असतं, असा दावा देखील त्यांनी यावेळी केला आहे.
पुढे बोलताना म्हणाले, आमच्या प्रभागाची मिटींग झाली असून त्या मिटींगमध्ये ठरले आहे. आगामी विधानसभेची निवडणूक आम्ही पूर्ण ताकदीने लढणार आहोत. गेली बारा वर्षे भाजपचा कार्यकर्ता आहे. दोन टर्म मी नगरसेवक राहिलो आहे. मी भाजपचे तिकिट मागत असून त्याच तिकिटावर मी निवडणूक लढवणार आहे.
चिंचवड मतदारसंघात 2009 सालापासून लक्ष्मण जगताप यांच्यासोबत मी प्रचार प्रमुख, निवडणूक प्रमुख म्हणून काम केलं आहे. मला या संपूर्ण मतदारसंघाची माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की, आतापर्यंत मला पक्षाने दोनदा डावलले, मात्र आता डावलेल असं मला वाटत नाही, असाही शत्रुघ्न काटे यावेळी म्हणाले.