उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील सिंधी पंचायत व सेवा समितीच्या वतीने गुरुनानक जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दोन वर्ष गुरूनानक जयंती साधेपणाने साजरी केली होती. मात्र यावर्षी मोठ्या उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. सिंधी समाज धर्मीयांमध्ये हा दिवस दिवाळी सणाप्रमाणे साजरा केला जातो. या दिवशी सिंधी समाज धर्मियांकडून मोठ्या उत्साहाने अनेक कार्यक्रम आणि कीर्तन आयोजित केले होते.
मंगळवारी (ता. ०८) सकाळी पहाटेपासूनच ‘गुरूग्रंथ साहेब’च्या दर्शनासाठी सिंधी समाज बांधवांनी गर्दी केली होती. यामध्ये चिमुकले आणि महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. गुरूनानक महाराज यांच्या चरणी माथा टेकवून आशीर्वाद घेतले. भाविकांसाठी ‘गुरु का लंगर’ची व्यवस्था केली होती. यामध्ये भाविकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती देवून या महाप्रसादाचा लाभ घेतला.
सिंधी समाज बांधवांसमवेत इतर धर्मीय बांधवांनी लंगर मध्ये भोजनाचा स्वाद घेतला. गुरुद्वारामध्ये मागील ७ दिवसांपासून धार्मिक कार्यक्रमांसह अखंड पाठाचे आयोजन करण्यात आले होते. या अखंड पाठाची समाप्ती करण्यात आली असून संत गुरुनानक यांच्या दर्शनासाठी व महाप्रसादासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
दरम्यान, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी ट्रकरला मोठ्या प्रमाणात सजावट करून विद्युत रोषणाई बरोबरच फुलांची, फुग्यांची सजावट केली होती. सगळा परिसर रोषणाईने उजळला होता. रात्रीच्या प्रहरी १ वाजून २० मिनिटांनी बांधवांनी ‘वाहेगुरु नामाचा’ जप करत जन्मोत्सव साजरा करून समाप्ती करण्यात आली.
कार्यक्रमाचे आयोजन हरिशेठ रोहिडा, शंकरलाल सुद्रांणी, राजेश माखिजा, हिरालाल पुरूसवाणी, गुरुदास चावला, काका (विनोद) माखीजा, हुंदराज चावला, मोहन मोटवाणी, खेमचंद पुरूसवाणी, दिलीप माखीजा, खुमेश पंजवाणी, कमलेश वलेचा, गोपाल तना, यांच्यासह उरूळीकांचन येथील सिंधी पंचायत व सेवा समिती ने आयोजन केले होते.