बारामती : लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी बारामती मतदारसंघात युगेंद्र पवार फिरले होते. तेव्हापासूनच बारामतीला नवा दादा मिळणार का? अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. तसेच आता आगामी विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवार आणि अजित पवार यांच्यात नवा राजकीय सामना रंगण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा पराभव झाल्यानंतर बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती.
या बैठकीमध्ये युगेंद्र पवार यांना बारामती तालुका कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरुन दूर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची अशी चर्चा रंगली होती. यामागे अजित पवार यांचा हात असल्याचे सांगितले जात होते. या पार्श्वभूमीवर आता युगेंद्र पवार हे अजित पवार यांच्याविरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत दिसत आहेत.
बारामती कुस्तीगीर संघाच्या वतीने दादांच्या वाढदिवसानिमित्ताने मैदानी कुस्तीचे आयोजन केले आहे. पण खरे मैदान आम्ही घेतो आणि घेत राहणार. मला बारामती कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदावरून हटवले, अशी चर्चा आहे. पण माझ्या वकिलांनी मला सांगितले आहे की, तु्म्हाला असं कोणीही अध्यक्षपदावरुन काढू शकत नाही. हा खेळ आहे, यामध्ये राजकारण आणले नाही पाहिजे, असे युगेंद्र पवार यांनी म्हटले. परवा बारामतीमध्ये अजित पवारांचा मेळावा झाला, तो त्यांच्या पक्षाचा मेळावा होता. परंतु कसा झाला ते आपण सगळ्यांनी पाहिलं, असेही युगेंद्र पवार यांनी सांगितले आहे.
अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे आयोजन
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त बारामतीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बारामतीतील शारदा प्रांगण या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रम स्थळाची पाहणी युगेंद्र पवार यांनी केली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यंदा अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला शरद पवार, सुप्रिया सुळे, भूषण होळकर येणार आहेत. यापूर्वी शरद पवारांच्या उपस्थित जयंती साजरी केली जायची, त्यांना कार्यक्रमांचं आमंत्रण असायचं. गेल्यावर्षी याठिकाणी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना आणण्यात आले होते. पण बदललेल्या राजकारणामुळे पवार साहेबांना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. मग साहेब कसे जयंतीला जाणार? म्हणून काही लोकांनी मिळून जयंतीचे आयोजन केले आहे. अहिल्याबाई होळकर या पुरोगामी विचारांच्या होत्या आणि साहेब देखील पुरोगामी विचाराचे आहेत, असे युगेंद्र पवार यांनी यावेळी म्हटले.