म्हसळा : मागील पाच दिवस म्हसळा तालुक्यात संततधार पावसामुळे नदीनाल्यांना पूर आले आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या अतिवष्टीत पाष्टी येथिल दुग्ध व्यवसायीक जगजीवन लाड यांच्या दोन गाभण म्हशी वाहून गेल्याची घटना समोर आली आहे. रोजच्या प्रमाणे लाड यांच्या म्हशी देहण जंगलभागात चरण्यासाठी गेल्या असता त्या सायंकाळी घरी परतत असताना पाष्टी देहन नदीला पुर आल्याने दोन्ही म्हशी वाहून गेल्या. यामुळे जीवन लाड यांचे सुमारे १.८० लक्ष रूपयांचे नुकसान झाले, असल्याचे म्हसळा महसुल विभगा मार्फत केलेल्या पंचनाम्यात नमुद करण्यात आले आहे.
दुग्ध व्यवसायीक जगजीवन लाड यांचे वयस्क वडील शेतकरी गोविंद लाड यांनी दोन दिवस अथक प्रयत्न करत देहण नदी नाल्यांमध्ये शोध घेतला असता नदी पात्रातील झाडी झुडपात मृतावस्थेत अडकलेल्या त्यांच्या दोन म्हशी आढळुन आल्या. घटनेची माहिती जीवन लाड यांनी म्हसळा तालुका प्रशासनाला दिली. तालुका महसूल अधिकारी आणि पशु वैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन घटनेचा पंचनामा केला असता १.८० लक्ष रूपयांचे नुकसान झाले असल्याचे नमुद करण्यात आले आहे.