कोल्हापूर: विशाळगडावर झालेल्या हिंसाचारानंतर आता कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज मैदानात उतरले आहेत. नुकसानग्रस्त झालेल्यांना तातडीने भरपाई राज्य सरकारकडून देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. विशाळगडवर झालेली हिंसाचाराची घटना ही जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच माजी खासदार संभाजीराजेंनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो. असे शाहू महाराज यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज हे विशाळगडाच्या परिसराची पाहणी करणार आहेत. विशाळगड परिसरातील घटना म्हणजे जिल्हा प्रशासन आणि पोलिसांचे अपयश असल्याचं शाहू महाराजांनी म्हटले आहे. या घटनेपूर्वी आम्ही जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना काही सूचना दिल्या होत्या, तरीदेखील ही घटना घडल्याचे त्यांनी म्हटले आहे. या हिंसाचाराबाबत संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी देखील शाहू महाराजांनी केली आहे.