पुणे : लोकसभा व विधानसभा निवडणुका एकत्र घेण्यासाठी निवडणूक आयोगाची तयारी असून सरकारने निर्णय घ्यावा, असे प्रतिपादन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केले आहे. मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाच्या शुभारंभावेळी निमित्ताने पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकसभा व विधानसभा या दोन्ही मुख्य निवडणुका एकत्र घेण्याचा निर्णय निवडणूक आयोग घेऊ शकत नाही, मात्र वन नेशन, वन इलेक्शन यामध्ये अनेक मुद्दे आहेत, ज्याचा अंतिम निर्णय सरकारलाच घ्यावा लागणार आहे. असे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.
पुण्यामध्ये मतदानाची टक्केवारी 50 टक्केपेक्षा कमी आहे. मतदान प्रक्रियेत सहभागी होतांना मतदानाची टक्केवारी वाढणे गरजेचे आहे. उद्योग क्षेत्राच्या प्रतिनिधींनी मतदानाविषयी जनजागृती करुन पात्र कर्मचारी, कामगारांना मतदार नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन त्यांनी केले. मतदार जागृती मंचाच्या प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांबाबत भारत निवडणूक आयोग सकारात्मक विचार करेल, अशी पुष्टी राजीव कुमार यांनी जोडली.
तृतीयपंथी मतदारांच्या नोंदणीसाठी आयोगाने प्रक्रिया अतिशय सोपी केली असून तंत्रज्ञान व जन्म दाखला आदी समस्यांवर मार्ग काढला जाणार आहे. निवडणूक प्रकियेच्या अनुषंगाने तृतीयपंथींयासाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्याबाबत आयोग आवश्यक ती कार्यवाही करेल, असे राजीव कुमार यांनी बोलताना सांगितले.