पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) गट क लिपिक पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येत आहे. या चाचणी दरम्यान विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामाना करावा लागत आहे. त्यामुळे विद्यार्थी त्रासले असताना चाचणी दरम्यान देण्यात आलेल्या खराब कि- बोर्डमुळे विद्यार्थ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवला जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना चाचणी दरम्यान कि-बोर्डमध्ये अडचणींचा सामाना करावा, त्यांची कौशल्य चाचणी पुन्हा घ्यावी. अशी मागणी विद्यार्थ्यांनी एमपीएससीकडे केली जात आहे.
एमपीएससीकडे ही चाचणी होण्यापूर्वीच कि-बोर्ड चांगले देण्याची मागणी केली होती. परंतु एमपीएससीने दुर्लक्ष करुन नेहमी प्रमाणे सावळा गोंधळ झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट क लिपिक पदाची मुंबईतील पवई येथील परिक्षा केंद्रावर १० ते ११ जुलै दरम्यान इंग्रजी टंकलेखन कौशल्य चाचणी देत असताना कि-बोर्डमध्ये अडचणी येत होत्या. कि-बोर्डमधील बॅकस्पेस, शिफ्ट कि आणि इतर काही बटणे अडकत होती. स्पेस बटन पुढे जात नव्हते. त्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करावा लागत होता. एमपीएससीच्या नियमावलीनुसार पर्यवेक्षकांना कि-बोर्ड बदलून देण्याची विनंती विद्यार्थ्यांकडून केली जात होती. परंतु त्याकडे परीक्षा पर्यवेक्षकाने लक्ष दिले नाही. तसेच कोणताही प्रतिसाद दिला नाही.
कि-बोर्ड बाबत वारंवार विनंती करूनही कि-बोर्डची साधी पाहणी देखील केली नाही. त्या उलट याची तक्रार करायची असेल तर एमपीएससीच्या कार्यालयाकडे करावी, असे सांगितले. मात्र परीक्षेदरम्यान असा प्रकार घडत असल्याने कि-बोर्ड बदलून दिला तर परीक्षा सुरळीतपणे देता येईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते.
मात्र प्रतिसाद कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे कि-बोर्डच्या खराब बटणांमुळे निर्धारीत वेळत टंकलेखन कौशल्य चाचणी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे आता लेखी परीक्षेत चांगले गुण मिळवून देखील केवळ खराब कि-बोर्डमुळे हे पद मिळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे. कौशल्या चाचणी परीक्षेचा अंतिम टप्पा आहे. कष्ट करुन देखील केवळ परीक्षा आयोजनातील चुकीच्या धोरणामुळे सरकारी नोकरी मिळविण्याचे स्वप्न पूर्ण न होण्याची भीती आहे. याचा विचार करुन एमपीएससीने कौशल्य चाचणी पु्न्हा घ्यावी, अशी थेट मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विद्यार्थ्यांनी केली आहे.
विद्यार्थी म्हणतात कि..
एमपीएससीकडून दि. १ ते ३ जुलै दरम्यान टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्यात येणार होती. परंतु. तांत्रिक अडचणीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर ही परीक्षा दि. ४ जुलै पासून सुरू झाली. परंतु त्यादिवशीदेखील कि-बोर्डची तांत्रिक अडचण दुर झालेली नसल्यामुळे ४ जुलै रोजी असणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यानंतर कि-बोर्डबाबतच्या अडचणी लक्षात आल्यावर लगेच दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच दि. ५ जुलै पासून ते ९ जुलै पर्यंत परिक्षाकेंद्रावर नवीन कि-बोर्ड देण्याची व्यवस्था करण्यात आली. पण त्यानंतर नवीन कि-बोर्ड १० जुलै ते १३ जुलै रोजी ३ ऱ्या मजल्यावर घेण्यात येणाऱ्या मराठी टंकलेखन उमेदवारांना देण्यात आले.
त्याच दिवशी ४ थ्या मजल्यावर असणाऱ्या इंग्रजी टंकलेखन उमेदवारांना अॅसेरचे जूने कि-बोर्ड देण्यात आले. हे कि-बोर्ड योग्यप्रकारे चालत नव्हते. यातील बटणे खराब झाली होती. कि-बोर्ड व्यवस्थित कार्य करीत नसल्यामुळे विद्यार्थ्यांनी बदलून देण्याची विनंती केली. पण एमपीएससीकडून नेमण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी कि-बोर्ड बदलून देण्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अपेक्षित कालावधीत पूर्ण चाचणी पूर्ण करता आली नाही. खराब कि- बोर्ड देणे म्हणजे हा एकप्रकारचा अन्याय आहे. याबाबत एमपीएससकडे तक्रारी केली आहे.
‘या’ कंपनीला काळ्या यादीत टाका…
एमपीएससीच्या गट क लिपीक पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी घेण्याची जबाबदारी टीसीएस कंपनीला देण्यात आली आहे. खासगी कंपनीकडून एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याची आपेक्षा होती. परंतु कंपनीने जूने कि-बोर्ड वापरुन विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. परीक्षेपूर्वी कंपनीने सर्व कि-बोर्डची तपासणी करणे आपेक्षित होते. तसेच चाचणी दरम्यान काही तांत्रिक अडचण आल्यास कि- बोर्ड बदलून देण्याची व्यवस्था करणे बंधनकारक होते. परंतु असे काही न करता जबाबदारी ढकलून विद्यार्थ्यांचे नुकसान करण्यात आले. त्यामुळे यां कंपनीला काळ्या यादीत टाकावे. अशीही संतापजनक मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.