पुणे : राज्यात नाही तर देशात ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची जोरदार चर्चा सुरु आहे. रोज नव्याने पूजा खेडकर यांचे एकेक कारनामे समोर येत आहे. पूजा खेडकर यांचे आई वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना ताजी असतानाच आता आणखीन एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा एक चेक अर्थात धनादेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मनोरमा खेडकर यांनी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या नावाने 12 लाख रुपयांचा चेक दिला होता. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्यावर जीएसटी विभागाने 19 कोटी रुपयांसाठी कारवाई केल्यानंतर मदतीचा ओघ राज्यभरातून येत होता. यावेळी मनोरमा खेडकर यांनी परिवर्तन प्रतिष्ठानच्या भालगाव नावाने 12 लाखांचा चेक दिला होता, हा चेक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, असे वृत्त एबीपी माझाने दिले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मनोरमा खेडकर या चर्चेत आल्या आहेत.
आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे प्रकरण समोर आल्यानंतर खेडकर कुटुंबियांनी पूर्वी केलेल्या गुन्ह्यांना वाचा फुटली आहे. गेल्या वर्षभरापूर्वी जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला शिवीगाळ तसेच दमदाटी करत जीवे मारण्याची धमकी देत शेतकऱ्यांवर पिस्तूल रोखल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पूजा यांचे वडील दिलीप खेडकर, आई मनोरमा खेडकर यांच्याबरोबर अंबादास खेडकर आणि अनोळखी दोन महिला, दोन पुरुष आणि गुडांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या वर्षी पूजा यांच्या आईने मुळशी मधील शेतकऱ्याला धमकी देत त्यावर पिस्तूल रोखल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर संबधित शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.