आमचं बालपण “सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय”? हे गीतकार मंगेश पाडगावकरांचे गाणे म्हणण्यात गेले. पण त्यावेळी पाऊस पडून शाळे भोवती तळे काही साचले नाही. आणि आम्हाला सुट्टी काही मिळाली नाही. ही जुनी घटना आठवण्याचे कारण ही तसेच आहे. हवामान खात्याने ९ जुलै रोजी जोरदार पाऊस पडणार आहे, अशी माहिती दिल्याने सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली. मात्र, त्या दिवशी पाऊसही पडला नाही आणि तळे ही साचले नाही.
७ व ८ जुलै रोजी राज्यात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. त्यामुळे राज्य सरकारने दुसऱ्या दिवशी शाळांना सुट्टी जाहीर केली. हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता. अनेकांनी या रेड अलर्टमुळे आपली कामं पुढे ढकलली. कामाचं नियोजन लोकांनी बदललं. मात्र, पावसाने सगळ्यांनाच चकवा दिला. प्रत्यक्षात पावसाऐवजी उन पडलं, पावसाने सपशेल विश्रांतीच घेतली. मात्र रेड अलर्टचा अंदाज वर्तवल्यानंतरही तसा पाऊस न झाल्याने हवामान विभागाचा अंदाज चुकला का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारण्यात आला. रेड अलर्ट हा पुण्यासाठी नव्हता, कोकण विभाग आणि घाट विभागासाठी होता, असं स्पष्टीकरण हवामान विभागाकडून देण्यात आले. मात्र, सोशल मीडियात हवामान खात्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले.
कोणत्याही ठिकाणी पाऊस पडणार का नाही? हे अनेक घटकांवर अवलंबून असतं. तिथे जमलेले ढग, त्यांची घनता, त्यांच्यातील आर्दता, त्यांची जमिनीपासूनची उंची, त्या उंचीवरचं तापमान आणि वाऱ्याचा वेग हे त्यातले प्रमुख घटक. हे सर्व घटक सॅटेलाईट इमेजेस आणि स्थानिक डोपलर रडार्सच्या माध्यमातून मोजले जाऊन पावसाचा अंदाज वर्तवला जातो. भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशात यातील बहुसंख्य घटक दर तासाला बदलत असतात, विशेषतः मान्सूनच्या काळात तर नक्कीच. ते कसे कधी का बदलतील हे सांगता येणं सध्यातरी शक्य नाही. त्यामुळे भारतात पावसाचं भाकित हे पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच पातळीवर राहतं. हे भाकित दर तासाने बदलत रहाण्याचीही भारतात दाट शक्यता असते.
वेधशाळा आणि स्थनिक प्रशासन पाऊस पडेल अशी शक्यता असेल तर लोकांना तशी सूचना देतं. ही शक्यता ज्या घटकांच्या आधारावर केली जाते, ते घटक रात्रभरात बदलू शकतातच. पण बदलले नाही तर जनजीवनावर जो परिणाम होईल याचा विचार करून लोकांना इशारे दिले जातात. आपण वेधशाळांचं अतिवृष्टीचं भाकित चुकत असल्याची कितीही चेष्टा करत असलो तरी, अतिवृष्टी होण्याची एक शक्यता होती. ती त्यांनी सांगितली म्हणून आपण काळजी घेतली. ती झाली नाही म्हणून आपण त्यांची चेष्टा करत आहोत. पण त्यांनी अतिवृष्टीची शक्यता सांगितली नसती आणि घडली असती तर आपलं काय झालं असतं याचा विचार करा.
पावसाचा रेड अलर्ट देऊनही पाऊस पडत नाही, हवामानाचा अंदाज चुकतो ? याला ब-याच गोष्टी कारणीभूत आहेत. भारताचे क्षेत्रफळ, दक्षिण उत्तर आणि पूर्व-पश्चिम लांबी, लाभलेला समुद्रकिनारा, तीन ऋतू, द्विपकल्प सदृश्य भौगोलिक रचना, विषुववृत्ता जवळ असणारा ऊष्ण कटिबंधातला देश आदी घटकांमुळे भारतात पावसाचा अंदाज वर्तवणे अवघड काम आहे. वेगवेगळ्या प्रदेशांत, विभागात हवामान वेगवेगळं असतं. त्यातही मान्सूनची हवामान प्रणाली ही अंदाज वर्तवण्यासाठी क्लिष्ट असते. मान्सूनचा संबंध हिंदी महासागराशी आहे. ती वैश्विक स्तरावरची प्रक्रिया आहे. अमेरिकेमध्ये संपूर्ण देशभर पसरलेली १५५ पेक्षा अधिक रडार्स आहेत. तर भारतामध्ये सध्या ३५ रडार आहेत. त्यामुळे कुठल्याही गोष्टीला सोशल मीडियात ट्रोल करणे सोपे आहे, परंतु वस्तुस्थिती जाणून घेऊन ट्रोल, टीका टिप्पणी करण्याची गरज आहे.
पत्रकार राजेंद्र बापू काळभोर,
पुणे जिल्हाध्यक्ष,
प्रिंट व डिजिटल मीडिया पत्रकार संघ.