सोनई : जमिनीच्या वादातून मारहाण करून अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याने गंभीर भाजलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यापक्ररणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे ही घटना घडली आहे. गणेश अर्जुन आव्हाड (वय ३५, रा. महालक्ष्मी हिवरे) असे मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत गणेश आव्हाड यांनी उपचार घेत असताना फिर्याद दिली आहे. त्यावरून मारुती मोहन सानप, शहादेव कारभारी सानप (दोघेही रा. महालक्ष्मी हिवरे, ता. नेवासा) यांच्यावर सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश आव्हाड यांच्या मावशीचे व मारुती सानप, शहादेव सानप यांचे जमिनीवरून एकमेकांचे वाद होते. दरम्यान, घरासमोर मोटरसायइलमधून बाटलीमध्ये पेट्रोल काढत असताना आरोपींनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
त्यावेळी हातातील प्लास्टिकच्या बाटलीतील पेट्रोल अंगावर पडले असता, आरोपी मारुती सानप याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने काडीपेटीने पेटवून दिले. या घटनेत फिर्यादी गणेश आव्हाड गंभीर जखमी झाले. त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार घेत असताना १२ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास सोनई पोलिस करत आहेत.