मुंबई : सध्या प्रवासी वाहनांच्या विक्रीत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रवासी वाहनांना प्रचंड मागणी आहे. चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून या तिमाहीत देशातील प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीने प्रथमच 10 लाखांचा आकडा पार केला आहे. हा आकडा गेल्या तिमाहीच्या तुलनेत 2.95 टक्के अधिक आहे.
एप्रिल-जून या कालावधीत एकूण 10,26,006 प्रवासी वाहनांची विक्री झाली. हा आकडा 2023-24 च्या याच तिमाहीत विकल्या गेलेल्या 9,96,565 युनिट्सपेक्षा 2.95 टक्के अधिक आहे. मात्र, प्रवासी कार विक्रीत घट झाली आहे. ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स’ (सियाम) च्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते जून या तिमाहीत 3,41,293 प्रवासी कार विकल्या गेल्या. हा आकडा मागील वर्षीच्या याच तिमाहीत विकल्या गेलेल्या 4,13,723 युनिटच्या तुलनेत 17 टक्के कमी आहे.
तर व्हॅनची विक्री वार्षिक 9 टक्क्यांनी वाढून 38,919 युनिट्स झाली. प्रवासी वाहनांच्या एकूण विक्रमी विक्रीत युटिलिटी वाहनांचा वाटा 63 टक्के आहे. युटिलिटी वाहनांची विक्री एप्रिल-जून तिमाहीत 18 टक्क्यांनी वाढून 6,45,794 युनिट्सवर पोहोचली आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत हा आकडा 5,47,194 युनिट्स होता.