हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : येथील महात्मा गांधी विद्यालयात १४ वर्षांपूर्वी दहावीत शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. १४ वर्षांनंतर पुन्हा एकत्रित जमलेले वर्गमित्र प्रथमच एकत्रितपणे भेटल्याने सर्वांच्याच चेहऱ्यावर आनंद व उत्साह दिसत होता. “तेच मित्रमैत्रिणी, तोच वर्ग, तेच बेंच, तीच सकाळची प्रार्थना, तेच दुपारचे झाडाखालचे जेवण, तीच ‘दोस्ती दुनियादारीचे’ याचे दर्शन पुन्हा १४ वर्षांनी अनुभूवायला मिळाले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयात २००८ मध्ये दहावीत शिक्षण घेतलेले विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र जमले होते. सर्वानी शालेय जीवनातील अनुभव कथन केले. चौदा वर्षांनंतर पुन्हा एकत्रित जमलेले वर्गमित्र भेटल्याने विद्यार्थी भारावून झाले होते. अत्यंत कमी दिवसांमध्ये नियोजन समितीने या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. आपल्या कामामध्ये व्यस्त असणारे २५० पेक्षा अधिक माजी विद्यार्थी आपल्या शाळेतील जुन्या मित्र मंडळींना भेटायला आणि शाळा व शिक्षकांप्रती आदर व्यक्त करायला या स्नेह मेळाव्यात सहभागी झाले होते. पुन्हा एकत्रित
कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश व शारदा पूजन करून करण्यात आले. आजी माजी शिक्षकांना पुष्प गुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाने भारावून गेलेल्या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला. माजी विद्यार्थी तुषार लोंढे यांनी वेगवेगळ्या रंगीबेरंगी फुलांची सुबक रांगोळी कार्यक्रमाची आकर्षण ठरली. त्यानंतर दुपारच्या सत्रात शाळेच्या आवारात वृक्षरोपणाचा कार्यक्रम झाला. त्यानंतर आपापल्या वर्गामध्ये बसून पुन्हा तब्बल १४ वर्षानंतर वर्ग भरवण्यात आले. शाळेतील काही आठवणींना आणखीन उजाळा देण्यासाठी त्यावेळी भेटणारे चिंचा, गोळ्या, बिस्किटे यांचे वाटप करण्यात आले.
शाळेतील गरजू विद्यार्थ्यांसाठी वार्षिक फी आणि शालेय उपयोगी वस्तू खरेदीसाठी देणगी स्वरूपात कार्यक्रमातून उरलेली रक्कम प्राचार्य भोसले यांच्याकडे सर्व माजी विद्यार्थ्यांतर्फे नियोजन समिती सुपूर्त करणार असल्याची माहिती निखिल कांचन यांनी दिली. कार्यक्रमात सहभागी शिक्षकांचे आणि माजी विद्यार्थ्यांचे नियोजन समितीच्या विद्यार्थ्यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
दरम्यान, कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन निखिल कांचन, अलंकार कांचन, अभिजीत गायकवाड, संदेश कांचन, निलेश कानकाटे, तुषार लोंढे, आबासाहेब दोरगे, अजिंक्य तुपे, निखील चोरडीया, रविराज बडेकर, गौरी कांचन, अदीती पवार, धनश्री सणस, पुनम झेंडे, प्रज्ञा कुंकूलोळ, निकीता जोशी, संध्या गाडे, अश्विनी कुलकर्णी, अश्विनी पाडंकर, नेहा म्हेत्रे, शीतल बधे, प्रियंका कांचन, राजश्री तुपे, पुजा चौरगुंडी, दीपाली चौधरी, राणी मदने यांनी केले होते.