लोणी काळभोर: ज्या ठिकाणी ज्ञानदानासारखे पवित्र कार्य केले जाते, तिला शाळा म्हणतात. या विद्येच्या घरात विद्यार्थ्यांना सुसंस्कृत, प्रामाणिक व देशाचा सजग नागरिक बनण्यासाठी धडे दिले जातात. मात्र, कोरेगाव मुळ (ता. हवेली) येथील अमर एज्युकेशनच्या खाजगी स्कूल बस चालकाने विद्यार्थ्यांना अश्लील शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार थेऊर फाटा येथे आज शनिवारी (ता.१३) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला आहे. यामुळे शाळेचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
बिरादार (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) असे विद्यार्थ्यांना शिवीगाळ करणाऱ्या बस चालकाचे नाव आहे. जर शाळेचा खाजगी स्कूल बस चालकच विद्यार्थ्यांना शिवीगाळ करीत असेल, तर विद्यार्थ्यांवर काय संस्कार होणार? असा सवाल पालकांनी यावेळी उपस्थित केला आहे. तसेच याप्रकरणी लवकरच लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचेही पालकांनी सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव मुळ (ता. हवेली) परिसरात अमर एज्युकेशन या नावानी एका ट्रस्टची इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. या शाळेत विद्यार्थ्यांना पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण दिले जाते. लोणी काळभोर व उरुळी कांचन परिसरातील शेकडो विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. शाळेने विद्यार्थ्यांसाठी चौधरी यांच्या एका खाजगी बससेवेचा रेफरन्स दिला होता. सदर बसवर बिरादार नावाचा व्यक्ती बस चालक म्हणून काम करीत आहे.
लोणी काळभोर परिसरातील विद्यार्थ्यांना शाळेची बस शनिवारी (ता.१३) सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घेण्यासाठी आली. तेव्हा काही विद्यार्थ्यांनी थांब्यावर बस थांबविण्यासाठी विनंती केली. मात्र, बसचालक बिरादार याने बस थांब्यावर न थांबविता पुढे नेली. यावेळी विद्यार्थ्यांनी बस का थांबवली नाही, अशी विचारणा केली. त्यानंतर बसचालकाने विद्यार्थ्यांना शिवीगाळ केल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
दरम्यान, या घटनेची माहिती विद्यार्थ्यांनी पालकांना दिली. त्यानंतर पालकांनी थेऊर फाटा येथे खाजगी स्कूल बस थांबवली व शिवीगाळ केल्याचा जाब विचारला. तेव्हा चालकाने उडवाउडवीची उत्तरे देऊन अरेरावीची भाषा केली. तसेच तुम्हाला काय करायचे ते करा? असे स्पष्ट सांगितले. त्यामुळे या बसचालकची मुजोरी वाढल्याचे दिसून येत आहे.
रिक्षा, बसचालक सुसाट
उरुळी कांचन, कोरेगाव मूळ, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीतील बहुतांश शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना रिक्षा व बसमध्ये अक्षरशः कोंबल्याचे चित्र पहायला मिळते. रिक्षाचालक व बसचालक रस्त्यावरून जाताना वेगाने गाडी चालवतात. वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याविषयीचे कोणतेही फलक शाळा परिसरात लावलेले नाहीत. एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिकांनी विचारला आहे.
बसचालकाने विद्यार्थ्यांना शिवीगाळ केली आहे. याबाबत बसचालकाला जाब विचारण्यासाठी गेलो होतो. तेव्हा त्याने अरेरावीची भाषा केली. त्यानंतर बसमधील विद्यार्थ्यांना खरा प्रकार विचारला असता, बसचालकाने शिवीगाळ केल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. या प्रकरणी शाळा प्रशासनाने लवकर कारवाई करावी. अन्यथा बसचालकाच्या विरोधात लवकरच लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहे.
-युवराज साबळे (पालक, लोणी काळभोर, ता. हवेली)
शाळेची अशी कोणतीही वैयक्तिक अथवा खाजगी बससेवा नाही. खाजगी बसने विद्यार्थी शाळेत येत आहेत. त्यामुळे शाळा आणि खाजगी बससेवा यांचा कसलाही संदर्भ नाही. मात्र, शाळेतील विद्यार्थ्यांशी त्यांचा संबंध असल्याने, त्यांना एकदा बोलावून समजून सांगते.
-मनीषा यादव (मुख्याध्यापिका – अमर एज्युकेशन, कोरेगाव मूळ)