शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचा अचानकपणे मृत्यू झाल्यानंतर महिनाभरापासून पत्नीच्या विरहात असलेल्या पतीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. जयेंद्र सुभाष शिंदे (वय-४५, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) असं गळफास घेऊन आत्महत्या केल्याल्या व्यक्तीचे नाव आहे.
ही घटना ११ जुलै रोजी निमगाव म्हाळुंगे येथे घडली. याबाबत मयूर रामदास शिंदे (वय-४२, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरुर ) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयेंद्र याची पत्नी छाया यांचे एक महिन्यापूर्वी देवदर्शनासाठी जाताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते. छाया यांचे निधन झाल्याने जयेंद्र नैराश्यामध्ये होते. ११ जुलै रोजी सकाळच्या सुमारास जयेंद्र अचानक घरातून गेल्याने त्यांच्या आई व भावाने त्यांचा शोध घेतला. यावेळी त्यांना जयेंद्रने शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले. तत्काळ जयेंद्र यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले.
दरम्यान, शिक्रापूर पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमोल चव्हाण करत आहे.