मुंबई : पंकजा मुंडे यांना राज्यात बराच संघर्ष करावा लागाला आहे. आधी विधानसभा निवडणुकीत पराभव, नंतर लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे यांचं राजकीय अस्तित्वावर प्रश्न चिन्ह उपस्थित होऊ लागले होते. परंतु, भाजपने पंकजा मुंडे यांना विधान परिषदेचं तिकीट दिलं आणि पंकजा मुंडे विजयी झाल्या. त्यामुळे राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे सक्रिय असणार आहे.
आधी विधानसभा आणि नंतर लोकसभा निवडणुकीत पराभव पदरी पडल्यानंतर अखेर भाजप नेत्या पंकजा मुंडे या विधान परिषदेत पोहोचल्या आहेत. पंकजा मुंडे या विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्या आहेत. त्यांनी विजयासाठी आवश्यक 23 मते घेऊन विजय मिळवला आहे. पंकजा मुंडे विजयी झाल्याने वरळीपासून परळीपर्यंत जल्लोष करण्यात येत आहे. पंकजा मुंडे या विधान परिषदेवर निवडून आल्याने त्या मंत्री होणार का? अशी चर्चाही आता सुरू झाली आहे.
विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान झालं. 12 उमेदवार रिंगणात असल्याने विधान परिषदेची निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. या निवडणुकीत काय होणार? अशी चर्चा होती. सतत पराभवाचा सामना करावा लागणाऱ्या पंकजा मुंडे यांचं काय होणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. संध्याकाळी पावणे सहाच्या दरम्यान मतमोजणीला सुरुवात झाली. या मतमोजणीत पंकजा मुंडे या 23 मते घेऊन निवडून आल्या आहेत.