मुंबई : विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरु आहे. सर्व पक्ष अलर्ट मोडवर असलेले दिसून येत आहेत. अशातच विधानपपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपच्या ताफ्यात दाखल झाले आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत मोहिते पाटील हे भाजप पक्ष कार्यालयात आल्याचे बघायला मिळाले. त्यांनी पक्ष कार्यालयात भाजप नेत्यांशी चर्चा देखील केली. यावेळी भाजप नेते प्रविण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड उपस्थित होते. माढा लोकसभेबाबत रणजितसिंह मोहिते पाटील यांनी घेतलेल्या संशयास्पद भूमिकेमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, आता ते भाजपच्या कार्यालयात पाहायला मिळाले.
रणजितसिंह मोहिते पाटील हे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र आहेत. ते सध्या भाजपचे विधनपरिषदेचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांचे चुलत बंधू धैर्यशील मोहिते पाटील हे भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी फार इच्छुक होते. परंतु, भाजपने त्यांना उमेदवारी दिली नाही. भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिली. त्यामुळं मोहिते पाटील नाराज असल्याचे बोलले जात होते.
तेव्हा धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना लोकसभेचे तिकीट मिळाले. या निवडणुकीत मोठ्या मतांनी धैर्यशील मोहिते पाटील विजयी झाले. या संपूर्ण प्रक्रियेत रणजितसिंह मोहिते पाटील शांत असल्याचे पाहायला मिळाले होते. त्यांनी कोणाचाच प्रचार केला नाही. मात्र. त्यांची भूमिका हि संशयास्पद दिसत असल्याचे बोलले जात होते. तसेच त्यांनी बंधु धैर्यशील मोहिते पाटील यांना मदत केली अशीही चर्चा राजकीय वर्तुळात होती.
रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या विरोधात आणला होता ठराव..
रणजितसिंह मोहिते पाटील यांनी विधानपरिषदेच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, असा ठराव माळशिरस तालुका महायुतीच्या वतीने करण्यात आला होता. तसेच मोहिते पाटील यांच्या संस्थांची चौकशी करावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. माळशिरस विधानसभा मतदारसंघ महायुतीची आढावा बैठक माळशिरस येथे घेण्यात आली होती, त्यावेळी ठराव घेण्यात आला होता.
2019 मध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश…
एक अभ्यासू, तसेच तरुण तडफदार नेतृत्व म्हणून रणजितसिंह मोहिते पाटील यांची सर्वत्र ओळख आहे. मोहिते पाटील हे शरद पवारांचे कट्टर समर्थक होते. परंतु, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा निरोप घेत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर मोहिते पाटील यांना विधानपरिषदेरवर पाठवण्यात आलं होतं. दरम्यान, यावेळी माढा लोलकसभा मतदारसंघातून भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत मोहिते पाटील यांनी निंबाळकरांना 1 लाख मताहून अधिक लीड माळशिरस मतदारसंघातून दिलं होतं.