पुणे : पुण्यातील वानवडी परिसरात जुन्या भांडणातून दोन जणांवर तलवारीने वार करुन गंभीर जखमी केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. याप्रकरणी १३ जणांवर गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे. हा प्रकार १० जुलै रोजी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हांडेवडी रोड वरील जैन टाऊन शीपच्या बाजूला घडला आहे. आरमान इस्लाम शेख आणि नदीम मोहम्मद हुसेन शख (रा. रामटेकडी) असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत.
याबाबत पोलीस शिपाई बालाजी वाघमारे (वय-३३) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अमीन अशिफ खान, आयान आजीम शेख, आबुरजर युसुफ शेख यांना अटक केली आहे. तर आरकान तसबीर शेख, अमन तसबीर शेख, रेहान रियाज खान, सादीक उर्फ बुरुन शेख, आफताब शेख, दानिश इब्राहिम शेख, फराज वजीर शेख, कैफ सलिम शेख, शाहरुख सलिम शेख (सर्व रा. सय्यदनगर), आरबाज शेख (रा. रामटेकडी, हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बालाजी वाघमारे आणि पोलीस शिपाई शिवानंद लुंगसे हे महंमदवाडी येथे रात्रपाळी कर्तव्य करत होते. त्यावेळी हांडेवाडी रोडवरील जैन टाऊनशीपच्याजवळ काही मुले एकमेंकामध्ये भांडण करुन गोंधळ घालत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे फिर्यादी व त्यांचे सहकारी त्या ठिकाणी गेले. त्यावेळी आरोपींनी आरमान शेख आणि नदीम शेख यांच्यावर वार करुन पळ काढला त्यावेळी फिर्यादींना आरकान शेख हा हातात तलवार घेऊन जाताना दिसला.
दरम्यान, आरोपींनी आरमान शेख आणि नदीम शेख यांच्यावर वार करुन गंभीर जखमी केल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात अरमान याच्या हाताचा कोपरा, पंजा व डोक्याला, तर नदीम याच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन तिघांना अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.