ग्वाल्हेर : पतीच्या सावळ्या रंगामुळे पत्नीने त्याला सोडून देत थेट माहेर गाठल्याची घटना मध्यप्रदेशातून समोर आली आहे. सावळ्या रंगामुळे सतत टोमणे देणारी पत्नी आपल्यासोबत नांदण्यास तयार नाही. त्यामुळे सासर सोडून माहेरी गेलेल्या पत्नीने आपल्याविरोधात छळाची तक्रारही दाखल केल्याचा दावा पतीने केला. पतीने देखील याप्रकरणी पत्नीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पण पोलिसांनी याप्रकरणात पुढील कारवाई करण्यापूर्वी दाम्पत्याची समजूत काढण्यासाठी त्यांना १३ जुलै रोजी पोलीस ठाण्यात बोलवले आहे.
ग्वाल्हेर शहरातील विकी फॅक्टरी भागात राहणाऱ्या एका व्यक्तीने सावळ्या रंगामुळे आपली पत्नी सोडून गेल्याचा दावा केला आहे. संबंधित व्यक्तीच्या मते, १४ महिन्यांपूर्वी त्याचा विवाह झाला होता; परंतु लग्नाच्या काही काळानंतर पत्नीने सावळ्या रंगावरून टोमणे मारण्यास सुरुवात केल्याने दोघांमध्ये भांडण होऊ लागले. त्यातच महिनाभरापूर्वी पत्नीने एक गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र, दहा दिवसांनंतरच चिमुकलीला सासरमध्येच सोडून ती माहेरी निघून गेली. पत्नीला परत आणण्यासाठी गेल्यानंतर तिने पुन्हा आपल्याला सावळ्या रंगावरून टोमणे मारत परत येण्यास नकार दिल्याचे व्यक्तीने म्हटले. याप्रकरणी मंगळवारी स्थानिक पोलिसांसमोरील लोकसुनावणीदरम्यान संबंधित व्यक्ती व त्याच्या आई द्वारे तक्रारदेखील दाखल करण्यात आली आहे.