पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातून चोरट्यांनी चंदनाची ५ झाडे चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात जगनाथ शंकर खरमाटे (वय-५८, नवी सांगवी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १८ जून ते १० जुलै या कालावधीत घडला आहे.
पुणे विद्यापीठाच्या आवारातून ही झाडे चोरून नेण्यात आली आहेत. शहरात सातत्याने चंदनचोरांकडून हेरगिरी करून सुरक्षित समजल्या जाणाऱ्या ठिकाणांवरूनच चंदनाची झाडे चोरून नेली जात आहेत. मात्र, या चोरट्यांचा पोलिसांना थांगपत्ता लागत नसल्याचे दिसून येत आहे.
फिर्यादी खरमाटे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्र विभागात नोकरीला आहेत. दरम्यान, नवस्पतीशास्त्र विभागात गार्डन आहे. त्या ठिकाणी चंदनाची दोन झाडे होती, तर शाहू महाराज यांच्या पुतळ्याशेजारी चंदनाची तीन झाडे होती. चोरट्यांनी १८ जून रोजी गार्डनमधील दोन चंदनाची झाडे कापून चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता.
यानंतर २६ जून रोजी शाहू महाराज पुतळ्याशेजारी असलेली चंदनाची ३ झाडे कापून चोरून नेली. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चतुश्रृंगी पोलिस करत आहेत.