नवी दिल्ली : देशातील पहिले अर्ध-स्वयंचलित बंदर असलेल्या विझिंजम येथे गुरुवारी पहिले मालवाहू जहाज उतरले. या जहाजाचे स्वागत करण्यासाठी केरळचे मंत्री व्ही. एन. वसावन आणि इतर मंत्री यांच्यासह बंदराचे उच्च अधिकारी उपस्थित होते. सॅन फर्नांडो हे मालवाहू जहाज हजाराहून अधिक कंटेनर घेऊन विझिंजम बंदरावर पोहोचले.
विझिंजम बंदरात सॅन फर्नांडो जहाजाचे आगमन हा टेस्ट ऑपरेशनचा एक भाग आहे आणि बंदर यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये अधिकृतपणे कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. विझिंजम बंदर हे देशातील पहिले अर्ध-स्वयंचलित बंदर असून, जे अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड, अदानी ग्रुप कंपनीने बांधले आहे.
या प्रकल्पाबाबत केरळ सरकार आणि अदानी पोर्ट्स कंपनी यांच्यात करार करण्यात आला. त्यानंतर हा प्रकल्प 5 डिसेंबर 2015 रोजी अदानी पोर्ट्सला देण्यात आला. या बंदराच्या उभारणीसाठी एकूण 8,867 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली होती, त्यापैकी 5,595 कोटी रुपये केरळ सरकारने आणि 818 कोटी रुपये केंद्र सरकारने वाटप केले होते. आता हे बंदर लवकरच सुरु होणार आहे.