लोणी काळभोर, (पुणे) : गेल्या काही दिवसांपासून लोणी काळभोर, कदमवाकवस्ती व परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो आहे. विजेचा होणारा खेळखंडोब्यामुळे परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत. कोणतीही पूर्वसूचना न देता होणाऱ्या खंडीत वीज पुरवठ्यामुळे नागरिकांची कामे खोळंबत आहेत. या सततच्या वीज पुरवठा खंडित होण्याने अनेकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते आहे.
विशेषत: कार्यालयीन कामकाजामुळे तसेच मुख्य बाजारपेठेसह दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी होत आहे. तर वीज वितरण कंपनीकडून विजेच्या खंडित होण्याबाबत कोणतीही आगाऊ सूचना ग्राहकांना दिली जात नाही. शहरात दिवसभरात वारंवार अचानक वीजपुरवठा खंडीत होत असल्यामुळे वीज उपकरणांचे नुकसान होत आहे. याबाबत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्वरित दखल घेऊन वीजपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन करावे, अशी मागणी वीजग्राहकांनी केली आहे.
खंडित वीजपुरवठ्यामुळे लहान व्यावसायिकांचे देखील आर्थिक नुकसान होत असून, दुग्धजन्य पदार्थ देखील खराब होत असतात. शासकीय कार्यालये, बँका, टपाल कार्यालय येथील कामकाजावर देखील खंडित वीजपुरवठ्याचा परिणाम होत असून, नागरिकांना कामासाठी तासंतास ताटकळत राहावे लागते. विज अचानक ये जा करीत असल्यामुळे विद्युत उपकरणांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन नागरिकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो.
दरम्यान, वीज वसुलीसाठी ग्राहकांकडे वारंवार पाठपुरावा करणारे वीज कर्मचारी खंडित वीज पुरवठ्याकडे का दुर्लक्ष करीत आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पालखीपूर्व झालेल्या कामांवर शंका
आठ दिवसांपूर्वी जगतगुरु संत शिरोमणी तुकाराम महाराज पालखी सोहळा हा कदमवाकवस्ती या ठिकाणी मुक्कामी होता. यावेळी लोणी काळभोर व कदमवाकवस्ती परिसरातील सर्व ठिकाणी असलेले धोकादायक झाडांच्या फांद्या व रोहीत्रांची तपासणी करून नवीन जोडण्या देण्यात आल्या होत्या. मात्र मागील अनेक दिवसांपासून लोणी काळभोर व कदमवाकवस्ती या परिसरात सातत्याने वीजपुरवठा खंडित होतो आहे. तक्रार निवारण केंद्राशी संपर्क साधला असता, तार तुटल्याचे वा रोहित्र्यावर लोड आल्याची कारणे दिली जातात. त्यामुळे पालखीपूर्व झालेल्या कामांवर नागरिक शंका घेत आहेत.
सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने घरातील विद्युत उपकरणे नादुरूस्त होत आहेत. त्याशिवाय फ्रीजमध्ये ठेवलेले अन्न, भाज्या, दूध खराब होत असल्याने आर्थिक नुकसानही होत आहे.
– प्रिया गायकवाड, लोणी स्टेशन, ता. हवेली