नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने गतवर्षी समलैंगिक विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला होता. या आदेशाचा पुनर्विचार करण्यासाठी दाखल याचिकांवरील सुनावणीतून वरिष्ठ न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी माघार घेतली आहे. खन्ना यांनी या प्रकरणापासून स्वतःला वेगळे केल्याने आता या प्रकरणात नव्याने पाच न्यायमूर्तीच्या नव्या घटनापीठाची स्थापना करावी लागणार आहे. न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी वैयक्तिक कारणाचा हवाला देत प्रकरणावर सुनावणी करण्यातून माघार घेतल्याचे सूत्रांनी बुधवारी सांगितले.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाकडून आदेशाचा पुनर्विचार करण्यासाठी दाखल याचिकांवर सुनावणी केली जाणार होती. पण या घटनापीठातील वरिष्ठ न्यायमूर्ती खन्ना यांनी माघार घेतल्याने आता नव्याने घटनापीठाची स्थापना करावी लागणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी या प्रकरणावर खुल्या न्यायालयात सुनावणी करण्यास नकार दिला होता. या प्रकरणावर चेंबरमध्ये सुनावणी केली जाणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले होते.