– अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरुर तालुक्यातील तळेगाव न्हावरे एन एच 548 डी या (24) किमी रोडचे साईट पट्टी दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरु आहे. या सर्व दर्जाहीन काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरवरती संबंधित अधिकारी कारवाई करणार का ?याबद्दल नागरिकांमधून चर्चा सुरु आहेत.
न्हावरे गावातून तळेगाव ढमढेरेपर्यंत 24 किमी अंतरावरील रोडच्या साईट पट्ट्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. साईट पट्ट्यावरती मुरूम टाकण्याऐवजी शेजारच्या शेतातील माती साईट पट्ट्यांवरती टाकत आहे. या साईट पट्ट्यावरती टाकलेल्या मातीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ही माती दुसऱ्या मोठ्या वाहनाच्या टायरच्या साह्याने व पावसाने डांबरी वरती आल्यास दुचाकी वाहने स्लीप होऊन अपघात होऊ शकतात. माती संदर्भात संबंधित ग्रामस्थांनी जाब विचारला असता, सुपरवायझरने सांगितले की आम्ही मुरम कुठून आणणार, आमच्याकडे मुरूम आणण्यासाठी साधन नाही.
साईट पट्ट्यावरील काट्या मुळापासून काढण्याऐवजी जेसीबीच्या साह्याने काढण्यात आल्या. या कॉन्ट्रॅक्टर वरती पीडब्ल्यूडी अधिकारी कारवाई करणार, की हाताची घडी तोंडावर बोट ठेवणार. अशा चर्चा नागरिकांमध्ये होत आहेत.
कुटे वस्ती येथील नागरिकांनी स्वखर्चाने साईट पट्ट्यावरील काट्या काढल्या आहेत. दिवसेंदिवस तळेगाव न्हावरे रोड वरती भरधाव वेगाने होणाऱ्या वाहतुकीचे प्रमाण वाढल्याने अपघाताचे सत्रही सुरुच आहे. स्थानिक नागरिकांना शेतात पायी जाण्यासाठी त्रास होत असल्याने एका बाजूच्या साईट पट्ट्यावरील काट्या स्थानिक नागरिकांनी स्वखर्चाने जेसीबीच्या साह्याने काढल्या आहेत.