अहमदनगर : गेले काही दिवस झाले राज्यात पुणे येथील प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी पूजा खेडकर या त्यांच्या झगमगाट वागणुकीमुळे प्रचंड चर्चेत आहेत. तसेच त्यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्यावरही गंभीर आरोप झाले आहेत. दिलीप खेडकर हे माजी सनदी अधिकारी राहिले असून पाथर्डी तालुक्यातील भालगाव हे त्यांचे मूळ गाव आहे. दरम्यान दिलीप खेडकर, सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांनी अहमदनगर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक सुद्धा लढवली आहे.
दिलीप खेडकर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात 40 कोटींची संपत्ती असल्याचे नमूद केले होते तेव्हा चर्चेला उधाण आले होते. एका सनदी अधिकाऱ्याकडे एवढी संपत्ती कशी असू शकते? याबाबत चांगल्याच चर्चा रंगल्या होत्या. विशेष म्हणजे दिलीप खेडकर यांची पत्नी डॉ.मनोरमा खेडकर यांनी देखील लोकसभा निवडणूक अर्ज भरला होता. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त माजी सरपंच होत्या. मनोरमा खेडकर यांचे वडील जगन्नाथ बुधवंत हे देखील सनदी अधिकारी होते त्यांची कारकीर्द देखील वादग्रस्त राहिली होती. दिलीप खेडकर यांना दोन अपत्य आहेत. पियुष खेडकर आणि पूजा खेडकर. पियुष खेडकर हा लंडनमध्ये शिक्षण घेत असल्याची माहिती मिळत आहे.
पंकजा मुंडेंच्या उमेदवारीसाठी देवीला दीड किलो चांदीचा मुकूट…
दिलीप खेडकर यांचे बंधू माणिक खेडकर हे पाच वर्षे भाजपचे तालुकाध्यक्ष राहिले आहेत. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना लोकसभा किंवा राज्यसभेची उमेदवारी मिळावी म्हणून दिलीप खेडकर यांनी मोहटादेवीला साकडे घातले होते. त्यावेळी ते म्हणाले होते कि, जर उमेदवारी मिळाली तर देवीला दीड किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण करू. तो नवस त्यांनी पूर्ण केला.
लोकसभा निवडणुकीआधी भालगावमध्ये भाजप उमेदवार सुजय विखे यांना काही स्थानिक नागरिकांनी विरोध केल्याने भाजपच्या तालुकाध्यक्षाच्या गावातच खासदाराचा अपमान झाल्याने माणिक खेडकर यांचे तालुकाध्यकपद काढून घेतल्याच्या चर्चा होत्या. त्यानंतर विखे आणि खेडकर यांच्या मतभेद झाल्यानेच दिलीप खेडकर यांनी वंचितकडून लोकसभा निवडणुक लढवली असल्याच्या चर्चा रंगत आहे.