मुंबई : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अमोल काळे यांचे T२० विश्वचषकांदरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यामुळे एमसीएच्या अध्यक्षपदाची जागा रिक्त असून त्यासाठी येत्या २३ जुलै रोजी निवडणूक पार पडणार आहे. भारतातील अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या एमसीएच्या निवडणुकीत शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि आशिष शेलार यांच्याकडून जोरदार ‘फिल्डिंग’ लावली जात आहे. अध्यक्षपदासाठी अजिंक्य नाईक आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे आज (दि. १०) अर्ज दाखल करणार आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी अर्ज घेतला असून ते बुधवारी दुपारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान, नाना पटोले अर्ज करणार असतील तर आपणही निवडणुकीच्या रिंगणात उतरून त्यांना धोबीपछाड देऊ, असे भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत बोलताना म्हटले की, आज मी एमसीएच्या अध्यक्षपदासाठी फॅार्म भरत आहे. मुंबई आनंदी परिसरातील होतकरू मुलांना क्रिकेटमध्ये संधी मिळाली पाहिजे, याकरता आम्ही काम करणार आहोत. दरम्यान मुंबई असोसिएशनचे कार्यक्षेत्र हे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, डहाणूपासून ते बदलापूरपर्यंत पसरले आहे. देशातील क्रिकेट क्षेत्रात मुंबई क्रिकेट असोसिएशन एक महत्त्वाची संघटना आहे. त्यात आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उतरण्याचा निर्णय घेतल्याने एमसीएची निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.