मुंबई: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा या पूर्वीप्रमाणेच एक दिवसाआड घेण्यात येतील, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधान परिषदेत दिले. डॉ. वजाहत मिर्झा यांनी याप्रकरणी लक्षवेधीतून प्रश्न उपस्थित केला होता.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वैद्यकीय अभ्यासक्रम पदवी आणि पदवीधर पदवी, तसेच पदविका या परीक्षांच्या दोन पेपर्सच्या दरम्यान एक दिवसाची सुट्टी न देता सलग परीक्षा घेणार असल्याचे परिपत्रक जूनमध्ये प्रसिद्ध केले होते. या चुकीच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी डॉ. वजाहत मिर्झा यांनी केली होती.
विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या चर्चेनुसार विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षा सलग घेण्याबाबत विद्यापीठामार्फत परिपत्रक जाहीर केले होते. मात्र, महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांतील वैद्यकीय विद्याशाखेच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी एक दिवसाआड परीक्षा घेण्याच्या बाजूने कौल दिल्याने आता पूर्वीप्रमाणेच एक दिवसाआड परीक्षा घेण्याबाबत विद्यापीठाचे एकमत झाले आहे.