नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात शेतजमिनीच्या वादातून एका वृद्ध शेतकऱ्याला जिवंत जाळल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली. या घटनेत वृद्ध शेतकरी ९५ टक्के भाजला असून त्यांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. कचेश्वर नागरे (वय-८०) असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. निफाड तालुक्यातील खर्डी सारोळे गावात ही घटना घडली आहे.
दरम्यान, कचेश्वर नागरे यांच्या शेजारी राहणाऱ्या कुटुंबीयांनीच त्यांच्यावर डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले. यानंतर नागरे यांच्या कुटुंबीयांनी जोपर्यंत आरोपींना अटक केली जात नाही, तोपर्यंत आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नागरे कुटुंबियांनी घेतली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कचेश्वर नागरे यांचा मुलगा संजय नागरे यांनी सांगितले कि, गेल्या सात-आठ वर्षांपासून थडी सरोळे गावात नांदूर मध्यमेश्वर चांगदेव महादू नगरे आणि कचेश्वर महादू नागरे यांच्यात शेतीचा वाद सुरु होता. मात्र, माझे वडील कचेश्वर महादू नांगरे आणि आई जिजाबाई नांगरे वयोवृद्ध असून एकटेच राहत होते. माझा भाऊ शेजारी राहत होता, पण तो कामासाठी बाहेर गेला होता. याचाच फायदा घेत माझ्या वडिलांवर डिझेलसदृश पदार्थ टाकून आरोपींनी पळ काढला, अशी माहिती संजय नागरे यांनी दिली.
नेमकं काय घडलं?
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतातील वडिलोपार्जित विहिरीवरुन नागरे बंधूंमध्ये वाद आहे. कचेश्वर नागरे हे मंगळवारी शेतातील घराजवळ साफसफाई करत असताना त्यांचा धाकटा भाऊ चांगदेव नगरे आणि भावजई आणि पुतण्यांनी कचेश्वर नागरे यांच्या अंगावर डिझेल टाकून त्यांना पेटवून दिले. आगीच्या ज्वालांनी वेढल्यानंतर कचेश्वर नागरे स्वतःला वाचण्यासाठी सैरभैर पळू लागले.
त्यांचा आवाज ऐकून त्यांचे कुटुंबीय धावत बाहेर आले. तोपर्यंत आरोपी चांगदेव नागरे आणि त्याचे कुटुंब घटनास्थळावरून पळून गेले. दरम्यान, कचेश्वर नागरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ९५ टक्के भाजल्याने कचेश्वर नागरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.