नांदेड : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. मराठवाड्यातील तीन आणि विदर्भातील एका जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. यासोबतच जमिनीतून गूढ आवाजही आल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. आज 10 जुलै रोजी सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास झालेल्या या धरणीकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मराठवाडा जिल्ह्यातील परभणी, हिंगोली, नांदेड या तीन तर विदर्भातील वाशीम या एका जिल्ह्यात हे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र प्रात:काळी बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे काही काळासाठी लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
परभणी जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यांत भूकंपाचा धक्का बसला आहे. सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी हा धक्का जाणवला असल्याची माहिती मिळत आहे. परभणी शहर, सेलू, गंगाखेड या भागात भुकंपाचे धक्के जाणवले आहेत. अचानकपणे जमीन हादरल्याने अनेक ठिकाणी लोक घाबरून गेले. दरम्यान, भूकंपाचा हा धक्का 4.2 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा होता, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात सकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला आहे. आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसून नागरिकांमध्ये भीतीच वातावरण निर्माण झाले. हिंगोली शहरालासुद्धा या भूकंपाचा धक्का जाणवला असून या भूकंपाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहे. हिंगोलीत झालेला हा भूकंप 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा होता, अशी माहिती मिळत आहे.
मराठवाड्यालगत असलेल्या वाशिमसह रिसोड तालुक्यातील काही भागांमध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी आणि सात वाजून 14 मिनिटांनी दोन वेळा भूकंपाची धक्के जाणवले. जयपूर, टनका, सोंडा, सावळी कृष्णा या गावात परिसरात घरावरील टीन पत्राचा मोठा आवाज झाला. गोठ्यात बांधलेली गुरेदेखील या भूकंपामुळे भयभीत झाले होते.