सांगली : सांगली शहरातील हनुमाननगर येथील एक तरुण सेल्फी घेताना तोल जाऊन पाण्यात पडल्याची घटना घडली होती. कृष्णा नदीच्या बंधाऱ्यावरून तीन दिवसांपूर्वी सेल्फी घेताना तोल जाऊन पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह काल ( दि.०९ ) सापडला. मोईन मोमीन (वय-24) असं पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, गेल्या दोन दिवसांपासून मोमीनच्या शोधासाठी विविध पथकांची शोधमोहिम सुरू होती. मात्र, दोन दिवसांच्या शोधमोहिमेत त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. त्याच्या शोधासाठी काल सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली. सांगलीतून वाहून गेलेल्या मोईनचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातील शिरटी येथील नदीपत्रात तीन दिवसांनी सापडला. मोईनला शोधण्यासाठी तब्बल ४६ तासांचे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले आहे.
नेमकं काय घडलं?
सांगलीतील एका तरुणीसोबत मोईन तीन दिवसापूर्वी कृष्णा नदीकाठावर आला होता. सांगलीवाडीच्या बाजूने तो कृष्णा नदीवरील बंधाऱ्यावर चालत-चालत आला आणि त्या ठिकाणी तो मैत्रिणीसोबत सेल्फी घेत असताना नदी पात्रात पडला. त्यावेळी त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणीने आरडाओरडा केला. काहींनी बंधार्याकडे धाव घेतली. तोपर्यंत मोईन दूरवर गेला होता.
या घटनेची माहिती मिळताच सांगली शहर पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली. स्पेशल रेस्क्यू फोर्स, आयुष हेल्पलाईन टीमने बोटीतून शोध मोहीम सुरु केली. मात्र, पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेलेला तो युवक मिळून आला नाही. त्यामुळे, सकाळी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात आली. पाण्याचा प्रवाह वाढल्याने शोध मोहीमेत अडथळा निर्माण होत होता.
त्यानंतर, बचाव पथकाकडून आज सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली. त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरटी येथील नदीपत्रात एक मृतदेह तरंगत असल्याची माहिती पथकाला मिळाली. तातडीने पथक घटनास्थळी दाखल होऊन मृतदेह पाहण्याबाहेर काढला. त्यावेळी हा मृतदेह मोईनचाच असल्याचे स्पष्ट झाले. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यानंतर तब्बल ४८ तासांनी तरुणाचा मृतदेह कोल्हापूर जिल्ह्यातच नदीपात्रात आढळून आला.