विशाल कदम
लोणी काळभोर : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सरसकट प्रोत्साहनात्मक अनुदान देण्याचे सरकारने जाहीर केले होते. दिवाळीपूर्वी काही शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळाला मात्र या अनुदानामध्ये किती शेतकरी पात्र ठरले? या योजनेचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला? अजून किती जणांना मिळणार आहे? या संदर्भात बँकेच्या अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, अधिकारी एकमेकांवर बोट दाखवून टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात मश्गुल आहेत. यामुळे पूर्व हवेलीतील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून गोंधळाचे वातावरण तयार झाले आहे.
राज्य शासनाने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी ५० हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले होते. परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी २०१७-२०१८, २०१८-२०१९ आणि २०१९-२०२० हा कालावधी विचारात घेऊन, या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन आर्थिक वर्षात पीक कर्जाची उचल करुन नियमित पूर्ण परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे अनुदान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केले होते.
दरम्यान, ज्या शेतकऱ्याने ५० हजार किंवा त्याच्या वर १ लाख किंवा त्याही पेक्षा जास्त कर्ज घेतले असून गेल्या तीन वर्षांत त्याने पीक कर्ज ठरवून दिलेल्या कालावधीत भरले आहे. त्या शेतकऱ्याला ५० हजार रुपये दिले जातील. ज्या शेतकऱ्यांचे पन्नास हजारांच्या आत कर्ज आहे त्यांना कर्ज इतकी रक्कम दिली जाणार आहे.
समजा, एका शेतकऱ्याने २० हजार कर्ज घेतले असेल तर त्याला २० हजार मिळतील. व ज्या शेतकऱ्याने १ लाख रुपये कर्ज घेतले असले तर त्याला ५० हजार रुपये मिळणार होते.
शासनाच्या निकषात बसणाऱ्या शेतकऱ्यांनी अनुदान मिळण्यासाठी अर्ज भरले होते. त्यानुसार लोणी काळभोर, कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, आळंदी म्हातोबाची येथील सोसायट्यांच्या मार्फत काही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला. मात्र अजूनही काही शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. अनुदान कधी मिळणार म्हणून शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी विचारणा केली असता, त्यांना अपेक्षित उत्तरे मिळाली नाहीत. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी PUNE PRIME NEWS च्या कार्यालयाची भेटून या संदर्भात माहिती दिली.
या संदर्भात लोणी काळभोर येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखा व्यवस्थापक सुरेश सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले हि माहिती बँकेचे शेती विकास अधिकारी नंदकुमार उर्फ बाळासाहेब भंडारी यांच्याकडे मिळेल. तर संबंधित अधिकाऱ्याकडे या संदर्भात विचारणा केली असता, त्यांनी शाखा व्यवस्थापकाचे नाव सांगितले. दोन्ही अधिकाऱ्यांनी माहिती न देता एकमेकांवर बोट दाखवून टोलवाटोलवीची उत्तरे दिली.
याबाबत बोलताना एक शेतकरी म्हणाले कि, दोन्ही अधिकारी हे जबाबदार असून त्यांनी एकमेकांवर टोलवाटोलवीची उत्तरे देणे योग्य नाही. अधिकाऱ्यांच्या या उत्तरांमुळे शेतकऱ्यांमध्ये गैरसमज निर्माण झाले असून, अनुदान मिळणार कि नाही या संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. यामुळे पूर्व हवेलीतील शेतकरीवर्ग अंधारात सापडला आहे.