दुसरबीड (बुलढाणा) : दुसरबीड शिवारातून दोन शेतकऱ्यांच्या चार म्हशी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ७ जुलैच्या पहाटे उघडकीस आली. याप्रकरणी किनगावराजा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्यांची पेरणी, डवरणी, फवारणीची लगबग सुरू असताना दोन्ही शेतकऱ्यांचे १ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहेत. दुसरबीड येथील नसीर शेख नुरमियों यांची दुसरबीड शिवारातच साडेतीन एकर शेती आहे. सदर शेतीमध्ये त्यांनी विटा-सिमेंटचा गोठा बांधलेला आहे.
६ जुलैच्या सायंकाळी नसीर यांनी गोठ्यातील दोन म्हैस व एक वगारास चारापाणी करून त्यांना गोठ्यात बांधले आणि ते घराकडे निघून गेले. ७ जुलैच्या पहाटे तीन वाजताच्या सुमारास झोपेतून उठल्यानंतर त्यांना गोठ्यातील म्हशी दिसून आल्या नाही. तसेच अर्धवट कापलेल्या दोऱ्या दिसून आल्या. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता शेतासमोरच असलेल्या अफरोज अली रियासत अली यांच्या गोठ्यासमोर बांधलेली म्हैस देखील चोरीस गेल्याचे त्यांना समजले. याप्रकरणी शेख नसीर व शेतकरी अफरोज अली यांनी किनगावराजा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
३१ मेच्या मध्यरात्री दुसरबीडमध्ये तीन ठिकाणी घरफोड्या झाल्या होत्या. त्यानंतर चोरट्यांनी एक दुचाकी क्रमांक एमएच-३७-एल- २२३० लंपास केली. तर ७ जुलैच्या पहाटे चार दुधाळ जनावरांची चोरी झाली. दीड महिन्यांत घरफोड्या, दुचाकी लंपास व गुरांच्या चोऱ्यामुळे ग्रामस्थांसह शेतकरी भयभीत झाले आहेत. पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रात्री गस्त करण्याची मागणी होत आहे.