छत्रपती संभाजीनगर : भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सुचनानुसार दरवर्षी १ जानेवारी या अर्हता दिनांकांवर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात येतो. या अंतर्गत साधारण दरवर्षी आक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध केली जाते व नंतर यावर दावे, हरकती घेऊन त्या निकाली काढून जानेवारी महिन्यात अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाते.
मात्र, यावर्षी भारत सरकारच्या विधी व न्याय मंत्रालयाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या राजपत्रानुसार दरवर्षी चार वेळा म्हणजेच १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ आक्टोबर मतदार यादी प्रसिद्ध होईल. उदाहरणार्थ आजपर्यंत एखाद्या मतदाराची जन्मतारीख दोन जानेवारी असेल तर त्याचे मतदार यादीत नाव येण्यासाठी एक वर्ष थांबावे लागायचे मात्र आता याच मतदारांचे नाव प्रसिध्द होणाऱ्या यादीत या मतदारांचे नाव येईल. यामुळे निश्चितच निवडणूक प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढेल व यातून लोकशाही बळकटीकरणाचे काम होईल.
या राजपत्रानुसार वयाची १७ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना मतदार यादीत नावनोंदविण्याची संधी मिळेल मात्र त्याचे नाव मतदार यादीत तो अठरा वर्षे वयाचा झाल्यानंतरच घेतले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.