मुंबई : वरळीमधील हिट अँड रन प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडाली होती. आता त्या प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. वरळीमधील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांनी आरोपी मिहिर शाह याला मुंबईतून अटक केली असून आरोपी मिहीर शाह अपघात घडल्यानंतर फरार झाला होता. तेव्हापासून तो बेपत्ता होता. पण मुंबई पोलिसांनी अखेर महिर शाह याला अटक केली आहे.
पोलिसांनी मिहीर शाहसह 12 जणांना अटक केली आहे. या 12 जणांमध्ये मिहिर शाह याच्या आई आणि बहिणीचादेखील समावेश आहे. दरम्यान, मुंबई पोलिसांनी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह याला ताब्यात घेतलं होतं. पण कोर्टाकडून त्याला आज जामीन मंजूर झाला. यानंतर आता पोलिसांनी मिहीर शाह याला अटक केल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
मिहीर शाह याने भरधाव कारने एका दाम्पत्याच्या दुचाकीला धडक दिली होतीत. तो तेवढ्यावरच थांबला नाही तर त्याने महिलेच्या अंगावर गाडी चालवत तिला फरफटत नेलं होतं. धडक दिल्यानंतर गाडी थांबली असती तर महिलेचे प्राण वाचू शकले असते. पण आरोपीने गाडी न थांबवता त्याने दूरपर्यंत महिलेला फरफटत नेलं. यामुळे महिलेचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर आरोपी मिहीर शाह आपली गाडी मुंबईच्या वांद्रे येथील कलानगर येथे सोडून पळून गेला होता. त्याने तिथून पळून जाण्याआधी त्याचे वडील राजेश शाह यांच्यासोबत फोनवर बातचित केल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आरोपी मिहीर शाह याने फोन स्विट्च ऑफ केला आणि तो पळून गेला होता. पोलीस त्याचा गेल्या दोन दिवसांपासून शोध घेत होते. आता मात्र मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे.