पुणे: जुन्या पुणे-मुंबई मार्गावर हॅरिस पुलाखाली रविवारी (दि. ७) मध्यरात्री दोन पोलिसांना चिरडल्यानंतर आरोपी गौरव ऊर्फ सिद्धार्थ केंगार घरी जाऊन ढाराढूर झोपला होता. पोलिसांनी त्याला घरात जाऊन बेड्या ठोकल्या. त्याला कार देणाऱ्या मित्राचा शोध जारी करण्यात आला आहे. गौरव ऊर्फ सिद्धार्थ राजू केंगार (वय २४, रा. बोपोडी) हे आरोपी कारचालकाचे नाव आहे. तपासासाठी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. दुरुस्तीसाठी दिलेली कार एकाने केंगार याच्याकडे परस्पर दिल्याची माहिती प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहे. केंगार याची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणापाठोपाठ झालेल्या या भीषण अपघातामध्ये पोलीस शिपाई समाधान आनंदराव कोळी (वय ४४) मृत्युमुखी पडले. या अपघातामध्ये कोळी यांचे सहकारी पोलीस शिपाई संजोग शिंदे गंभीर जखमी झाले आहेत. कोळी गेले काही वर्षे वाहतूक नियंत्रण विभागात नेमणुकीस होते. तेथून दहा दिवसांपूर्वीच त्यांची खडकी पोलीस ठाण्यात बदली झाली होती. ते रविवारी रात्री सहकारी संजोग शिंदे यांच्यासोबत खडकी परिसरात गस्त घालत होते. बोपोडी रेल्वे भुयारी मार्ग परिसरात भरधाव मोटारीची त्यांना धडक बसली. त्यामध्ये शिंदे दुचाकीसह रस्त्याच्या कडेला पडले, तर कोळी उडून फेकले गेले. कारच्या चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तेथून चाललेल्या एका वाहनचालकाने या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाल दिली. त्यानंतर, स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी गेले. त्यांनी कोळी व शिदि या दोघांना खडकीतील कॅन्टोन्मेंट रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच कोळी यांचा मृत्यू झाला होता.
अपघातानंतर पसार झालेल्या मोटारचालक केंगारचा शोध घेण्यात आला. पोलिसांचे पथक केंगारच्या घरी पोहोचले. तेव्हा तो घरात ढाराढूर झोपला होता. तेथून त्याला खडकी पोलीस ठाण्यात नेण्यात आले. केंगार फुगेवाडीतील एका मोटार सर्व्हिस सेंटरमध्ये काम करतो. त्याला रॉबीन नावाच्या मित्राने ही कार दिली होती. मोटारीतून चक्कर मारण्यासाठी तो बाहेर पडला. मात्र, भुयारी मार्गात त्याचे नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात झाला. त्याच्याविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात भरधाव वेगाने वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.