मुंबई : काही महिन्यातच विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातील गणपती बाप्पाचं दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील सर्व आमदार आणि मंत्रीही उपस्थित होते.
जनतेचा विश्वास आम्ही पुन्हा जिंकू, सिद्धिविनायकाने आशीर्वाद द्यावा असं साकडं घातल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. 14 जुलै रोजी बारामतीमध्ये आमची जाहीर सभा होत असल्याने त्याची सुरुवात आज केल्याचे अजित पवार यांनी बोलताना सांगितले. यावेळी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, अदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील यांसह सर्व महत्त्वाचे नेते मंडळी उपस्थित होते.
अजित पवारांनी सिद्धिविनायक मंदिरातील बाप्पाचे दर्शन घेत प्रचाराचा नारळ फोडला आहे. तसेच येत्या निवडणुकींसाठी बाप्पाला साकडेही घालण्यात आले. मंगळवारी अजित पवारांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्याने भाविकांचा मोठा खोळंबा झाल्याचा पाहायला मिळाले. यावेळी अजित पवार आणि प्रफुल्ल तटकरे यांनी मिळून पूजाही केली.
यावेळी अजित पवारांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर म्हणाले, आज अंगारकीचा अतिशय चांगला दिवस आहे. या दिवशी आपण चांगली सुरुवात करत असतो. आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोणत्या कोणत्या योजना दिलेल्या आहेत त्या लोकांपर्यंत पोहचवणे आणि पुढे वाटचाल करताना विकासाचा मुद्दा घेऊन वाटचाल करणे आणि हे करताना मुंबईत असल्याने आम्ही सिध्दीविनायकचे दर्शन घेत आहोत. विधान परिषदेच्या नाही तर विधानसभेच्या निमित्ताने तसेच आमचा पक्ष मजबूत करण्याच्या दृष्टीने प्रचाराची सुरुवात करत आहे.