बीड : बीडमध्ये चार वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. छोटा हत्ती, रिक्षा, दुचाकी आणि कंटेनर या वाहनांचा अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून ५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही घटना सोमवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास बार्शी नाका परिसरातील संभाजी चौकात घडली. या विचित्र अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
या अपघातात बबन बाबूराव बहिरवाळ (वय-४०, रा. भाळवणी, ता. बीड) आणि मोतीराम अभियान तांदळे (वय-२८, रा. तांदळवाडी, ता. केज) यांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सोलापूर-धुळे या राष्ट्रीय महामार्गावरून बीड शहरात प्रवेश करताना संभाजी चौकात हा अपघात झाला. छोटा हत्ती, रिक्षा, दुचाकी आणि कंटेनर ही वाहने एकमेकांवर जोरदार आढळली. कंटेनरची धडक रिक्षाला बसल्याने अपघात झाला आहे. तर गॅस सिलिंडरचा पुरवठा करणारा छोटा हत्ती वाहनाची दुचाकीला धडक बसली. या विचित्र अपघातात रिक्षातील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ५ जण जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे चौकात वाहतूक कोंडी झाल्याने प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. या विचित्र अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अपघातग्रस्त वाहने रस्त्यावरून बाजूला करण्यात आली असून वाहतूक कोंडी सुरळित करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.