पुणे: पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवे टर्मिनल सेवा पुरवण्यास सज्ज होत असून सीआयएसएफच्या जवानांच्या पूर्ततेनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात आहे. येत्या रविवारी म्हणजेच १४ जुलै रोजी हे नवे टर्मिनल सुरु होणार आहे. तसेच नवे टर्मिनल कार्यान्वित करताना नव्या टर्मिनलच्या पहिल्या प्रवाशाला दुपारी १ वाजता बोर्डिंग पास देण्यात येणार, असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.
दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर नव्याने साकारलेल्या टर्मिनलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असणारे सीआयएसएफचे मनुष्यबळ गृहविभागाकडून मंजूर करण्यात आले आहे. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार पाठपुरावा केला होता. मनुष्यबळासंदर्भात मोहोळ यांनी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती.
पुणे विमानतळावरुन होणाऱ्या उड्डाणांची गरज लक्षात घेत नवे टर्मिनल साकारण्यात आले होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी त्याचे उद्घाटनही झाले होते. मात्र, सीआयएसएफच्या मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे या टर्मिनलचा प्रत्यक्ष वापर सुरु झाला नव्हता. मोहोळ यांनी केंद्रीय राज्यमंत्री शपथ घेतल्यानंतर लगेचच या प्रकरणी लक्ष घालून गृह विभागाकडे पाठपुरावा सुरु केला. त्यानंतर पुणे विमानतळासाठी २२२ विविध पदांना मंजुरी मिळाली. ही पदे ७ प्रकारांची आहेत. या नव्या संख्येसह पुणे विमानतळासाठी आता सीआयएसएफच्या मनुष्यबळाची संख्या ७१५ वर गेली आहे. नव्या टर्मिनलसाठी आवश्यक असणारी संख्या आता पूर्ण झाली असून नवे टर्मिनल वापरात आणण्यात आता कोणताही अडथळा उरलेला नाही. त्यामुळे हे टर्मिनल येत्या रविवारपासून खुले होणार आहे.
Pune Airport’s new terminal to be functional from this Sunday !
After completing the requirements of CISF personnel & other technicalities, the new terminal of Pune Intl Airport is set to be at the service of citizens, from 14th July, Sunday.
As an inaugural gesture, I will be… pic.twitter.com/rQ43AURo5j
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) July 8, 2024
मंत्री मोहोळ यांच्याकडे नागरी हवाई वाहतूक विभागाची जबाबदारी आल्यानंतर पहिल्याच दिवसापासून त्यांनी पुणे विमानतळाच्या प्रश्नांबाबत विशेष लक्ष घातले. याचाच सकारात्मक परिणाम म्हणजे अवघ्या चार आठवड्यात पुणे विमानतळाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागला आहे. यात धावपट्टी वाढवण्यासाठी शक्यता तपासणी सर्वेक्षणला (OLS) परवानगी मिळाली. तसेच पार्किंग बेवर पार्क केलेले विमान संरक्षण दलाच्या जागेत हलवण्यात आले, या दोन्ही विषयांसदर्भात मोहोळ यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. त्यानंतर आता नवे टर्मिनल खुले होत आहे.