लोणी काळभोर, (पुणे) : दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक ६ मध्ये ई म्युटेशनद्वारे झालेला नोंदणीकृत दस्त करताना कोणतीही नेटवर्क समस्या नसताना संबंधित तलाठ्याच्या लॉग इन दिसत नसल्यामुळे कोणत्या व्हायरसमुळे ई – फेरफार गायब झाला की, केला गेला? याविषयी गूढ वाढले आहे. हा प्रकार लोणी काळभोर येथे घडला असून तलाठी कार्यालय व दुय्यम निबंधक कार्यालय याठिकाणी ई म्युटेशनचा फेरफार शोधताना खातेदार त्रस्त झाले आहेत.
लोणी काळभोरचे तलाठी पवनकुमार शिवले यांच्या दफ्तर दिरंगाईबाबत संबंधित खातेदार शेतकऱ्याने तक्रार केली होती. त्यामुळे त्याच तक्रारदार शेतकऱ्याची ई म्युटेशन नोंदणीकृत फेरफार नोंद गायब झाल्याने तलाठ्याच्या कार्यपध्दतीवर नागरिक शंका व्यक्त करत आहेत.
हवेली दुय्यम निबंधक कार्यालय क्रमांक ६ येथे लोणी काळभोर येथील गट नंबर १९४० वरील खरेदीखत दस्त २५ औगस्ट २०२२ रोजी नोंदवलेला आहे. यावेळी ई म्युटेशन फेरफार १४०४५ झालेला असून त्याला कोणताही अडथळा (एरर) न येता संबंधित ई फेरफार तलाठ्याच्या लॉगिनला गेलेला आहे.
त्याबाबतचा पुरावा दुय्यम निबंधक कार्यालयाने संबधिताना दिलेला आहे. मात्र संबंधित तलाठ्याने आमच्याकडे लॉगिनला संबंधित फेरफार दिसत नसल्याचे सांगितले. तक्रारदार शेतक-यांने शेवटी ऑफलाईन पध्दतीने प्रत्यक्ष गाव कामगार तलाठ्याला दस्ताची प्रत देऊन त्याची पोच घेतल्यावर अनोंदणीकृत फेरफार क्रमांक १४०४८ झाला आहे.
याबाबत बोलताना ॲड. सुजीत कांबळे म्हणाले, “लोणी काळभोर येथील दस्त क्रमांक १४३८०/२०२२ हा नोंदणीकृत ई म्युटेशन दस्त २५ ऑगस्टला नोंदवलेला आहे. त्यात कोणत्याही स्वरुपाची त्रुटी नाही. तसेच दुय्यम निबंधक कार्यालयाचा सर्व्हर हा तलाठी कार्यालयाच्या सर्व्हरला लिंक केलेला असल्याने ई म्युटेशन फेरफार क्रमांक १४०४५ गायब होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”