पुणे : राज्यात आज सोमवारी (ता.08) सर्वच जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे सर्वच जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे. तसेच रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर वरुणराजानं कृपादृष्टी केल्याचं पाहायला मिळत आहे. मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढला असून ठिकठिकाणी पाणी साचले आहे. तसेच, पुढचे तीन ते चार तास मुंबई आणि उपनगरांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागाने आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. सोमवारी सुद्धा हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी दिली आहे. मुंबईत रविवारी मध्यरात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक सखल भागात पाणी देखील साचले आहे. आठवड्याच्या पहिल्या दिवशीच मुसळधार पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे मुंबईकरांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे.
पुढील 3-4 तास मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 3 तासानंतर पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवला आहे. रविवारी (ता.08 जुलै) काल रात्री 1 ते सकाळी सातपर्यंत अनेक ठिकाणी 300 मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.
आज मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर मराठवाडा व विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज 8 जुलै रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार तर विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.