पुणे : पुणे जिल्ह्यातील नारायणगावातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पोलीस ठाण्यात तक्रार केल्याच्या रागातून तरुणाने दोन महिलांवर लाकडी दांडके आणि चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव-कोल्हेमळा येथे ६ जुलै रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या हल्ल्यात दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दीपाली संजय गाडेकर (वय-२७, रा. निरामय सोसायटी, कोल्हेमळा, नारायणगाव, ता. जुन्नर) आणि शैला ऊर्फ भारती विजय थोरात (वय-३२, रा. साकारनगरी, नारायणगाव, ता. जुन्नर) अशी जखमी झालेल्या महिलांची नावे आहेत. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे.
याबाबत दीपाली गाडेकर यांनी नारायणगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून प्रशांत जालिंदर मुळे (वय-३२, रा. निरामय सोसायटी, कोल्हेमळा, नारायणगाव, ता. जुन्नर) असं अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दीपाली गाडेकर व प्रशांत मुळे हे कोल्हेमळा येथील निरामय सोसायटीत राहण्यास आहेत. पूर्वी झालेल्या वादातून गाडेकर यांनी आरोपी मुळेच्या विरोधात नारायणगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यामुळे मुळेच्या मनात गाडेकरविषयी राग होता.
शनिवारी दुपारी गाडेकर या त्यांची मैत्रीण शैला ऊर्फ भारती थोरात यांच्यासोबत निरामय सोसायटीच्या पार्किंगमध्ये गप्पा मारत बसल्या होत्या. त्यावेळी मुळे त्या ठिकाणी आला. त्याने लाकडी दांडक्याने आणि चाकूने थोरात यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा हात फॅक्चर होऊन गंभीर जखमी झाल्या.
याप्रकरणी गाडेकर यांनी दिलेल्या फियर्यादीवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत.